बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिशा पटानीच्या घरावर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. दिशाच्या उत्तर प्रदेशातील बरेलीतील घरावर हा गोळीबार झाला आहे. पहाटे 3.30 ते 4 च्या आसपास हा गोळीबार झाल्याचे समोर आली आहे. या गोळीबाराची जबाबदारी रोहित गोदारा आणि गोल्डी ब्रार टोळीने घेतली आहे. सध्या या गोळीबारात कोणीही जखमी झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
रोहित गोदरा आणि गोल्डी ब्रार टोळीने या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे. एका व्हायरल पोस्टमध्ये प्रेमानंद महाराजांचा अनादर केल्यामुळे गोळीबार करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले आहे. या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “मी वीरेंद्र चरण, महेंद्र सरन (डेलाना) आहे. बंधूंनो, आज खुशबू पटानी, दिशा पटानी यांच्या घरावर (व्हिला नंबर 40, सिव्हिल लाईन्स, बरेली, उत्तर प्रदेश) झालेला गोळीबार आम्ही केला आहे.
धर्माचा अनादर केला
या पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, तिने पूज्य संतांचा (प्रेमानंद जी महाराज आणि अनिरुद्धाचार्य जी महाराज) अपमान केला आहे. तिने सनातन धर्माचा अवमान करण्याचा प्रयत्न केला आहे. आमच्या देवतांचा अपमान सहन केला जाणार नाही. हा फक्त एक ट्रेलर होता. पुढच्या वेळी जर तिने किंवा इतर कोणी आपल्या धर्माचा अनादर केला तर त्याच्या घरात कोणीही जिवंत राहणार नाही. हा संदेश केवळ तिच्यासाठीच नाही तर चित्रपट क्षेत्रातील सर्व कलाकारांसाठी आणि त्याच्याशी संबंधित लोकांसाठी आहे.
पोस्टद्वारे धमक्या
या व्हायरल पोस्टमध्ये पुढे म्हटले आहे की, ‘आगामी काळात जो कोणी धर्म आणि संतांविरुद्ध असे अपमानजनक कृत्य करेल त्याने परिणाम भोगण्यास तयार राहावे. धर्माचे रक्षण करण्यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाण्यास तयार आहोत. आम्ही कधीही मागे हटणार नाही. आमच्यासाठी धर्म आणि समाज एक आहे आणि त्यांचे रक्षण करणे हे आमच्ये पहिले कर्तव्य आहे.
दिशा पटानीच्या बरेलीच्या घरावर झालेल्या गोळीबाराची माहिती देताना बरेलीचे एसएसपी अनुराग आर्य यांनी म्हटले की, आज पहाटे 3.30 वाजता निवृत्त सीईओ जगदीश पटानी यांच्या घरी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांची पथके तात्काळ घटनास्थळी पाठवण्यात आली होती. या घटनेची पुष्टी होताच, गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.