आशिया कप स्पर्धेच्या साखळी फेरीतील सामने शेवटच्या टप्प्यात आले आहेत. सुपर 4 फेरीत जागा मिळवण्यासाठी आता धडपड सुरु आहे. भारतीय संघाची सुपर 4 फेरीतील जागा जवळपास निश्चित आहे. पण औपचारिक घोषणा होणं बाकी आहे. तर पाकिस्तान आणि युएई या संघात दुसऱ्या संघासाठी चुरस आहे. 17 सप्टेंबरला होणाऱ्या सामन्यातून दोन्ही संघापैकी विजेत्या संघाला पुढचं तिकीट मिळेल. पण हा सामना पाकिस्तान खेळणार की नाही हा मोठा पेच आहे. कारण या सामन्यात सामनाधिकाऱ्याची भूमिका अँडी पायक्रॉफ्ट हे बजावणार आहे. यापूर्वी भारत पाकिस्तान सामन्यात त्यांनी ही भूमिका बजावली होती. त्यावर पाकिस्तानने आक्षेप घेतला होता. कारण भारतीय संघाने हस्तांदोलन केलं नाही यासाठी त्यांनी अँडी पायक्रॉफ्ट यांना जबाबदार धरलं होतं. जर पुढच्या सामन्यात अँडी पायक्रॉफ्ट असतील खेळणार नाही असं पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितलं होतं.
अँडी पायक्रॉफ्ट यांची तक्रार त्यांनी आयसीसीकडे केली होती. वृत्तानुसार, आयसीसीने या तक्रारीला केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे पाकिस्तानला मोठा फटका बसला आहे. आता बोललेलं वचन पाळायचं की मान खाली घालून खेळायचं असा प्रश्न आहे. पाकिस्तान युएई सामन्यात अँडी पायक्रॉफ्ट सामनाधिकारी आहेत. त्यामुळे पाकिस्तानची पुरती लाज गेली आहे. हा सामना पाकिस्तान खेळला नाही तर स्पर्धेतून आऊट होईल. तसेच युएई संघाला सुपर 4 चं तिकीट मिळेल. त्यामुळे पाकिस्तानवर नामुष्की ओढावली आहे.
भारताने साखळी फेरीतील सामन्यात पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. पण पाकिस्तानात या पराभवापेक्षा टीम इंडियाने हस्तांदोलन केलं नाही याची चर्चा रंगली. पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय पातळीवर लाज गेल्याने क्रिकेट बोर्डाने आयसीसीकडे तक्रार केली. पण त्यांच्या तक्रारीचा काही एक उपयोग झालेल्या नाही. पाकिस्तानच्या आरोपानुसार, दोन्ही संघांना हस्तांदोलन करण्यास पायक्रॉफ्ट यांनी मनाई केली होती. पण पायक्रॉफ्ट यांची यात काहीच भूमिका नव्हती. टीम इंडियानेही पायक्रॉफ्ट यांच्यावर केलेले आरोप फेटाळून लावलेहोते. यामुळेच आयसीसीने पायक्रॉफ्ट यांना क्लीन चिट दिली आणि पीसीबीची मागणी फेटाळून लावली.