India Beat Pakistan Asia Cup Final 2025 : भारतीय संघाने आशिया कपच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानला हरवून ट्रॉफी (Asia Cup 2025 Final 2025 Trophy) जिंकली. दोन्ही संघ सलग तीन सामन्यात भिडले, प्रत्येक सामन्यात पाकिस्तानला भारताकडून पराभव पत्करावा लागला. लीग स्टेज आणि सुपर फोर नंतर, भारताने अंतिम सामना जिंकून पाकिस्तानला धूळ चारली. नाणेफेक गमावल्यानंतर आणि प्रथम फलंदाजी केल्यानंतर, पाकिस्तान 146 धावांवर गारद झाला. तिलक वर्माच्या दमदार खेळीमुळे भारताने 5 विकेट्सने विजय मिळवला आणि ट्रॉफी जिंकली.
भारत विजेता ठरल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि अभिषेक शर्मासह पत्रकार परिषदेसाठी आला. यावेळी एका पाकिस्तानी पत्रकाराने सूर्यकुमार यादवला जो प्रश्न विचारला, तो प्रश्न कमी आणि त्याचा हताशपणा जास्त वाटत होता. आपल्या मनातला सगळा राग आणि खदखद त्याने एका प्रश्नातच बाहेर काढली. पण तो प्रश्न विचारताच, सूर्यकुमार यादव थांबला पण उत्तर देणं भागच होतं.
पाकिस्तानी पत्रकाराने नक्की विचारलं काय?
पाकिस्तानी पत्रकाराने हस्तांदोलन न करणं, फोटोसेशन टाळणं, राजकारणासारखी पत्रकार परिषद घेणं अशा गोष्टी मोजून विचारलं. “तुम्ही पाकिस्तानी संघाशी असं वागलात का? तुम्हाला वाटत नाही का की क्रिकेटमध्ये राजकारण आणणारे पहिले कर्णधार तुम्ही आहात?” हे ऐकून सूर्यकुमार यादव आधी हसला आणि मग त्याला ठाम उत्तर दिलं. पत्रकाराचा प्रश्न हा त्याच्या मनातल्या जखमा मांडणारा होता, पण सूर्यकुमारचं उत्तर त्या जखमांवर मीठ चोळल्यासारखं ठरलं.
सूर्यकुमार यादवचं परफेक्ट उत्तर
सूर्यकुमार यादव म्हणाला की, “गुस्सा हो रहें आप?” त्याने ज्या सहज आणि हसऱ्या स्वरात हे विचारलं, तेच जास्त कमाल होतं. त्यानंतर तो म्हणाला की, “तुम्ही एकाच वेळी इतक्या गोष्टी विचारल्या की खरं सांगायचं तर तुमचा प्रश्नच समजला नाही.” दुसऱ्या शब्दांत याचा अर्थ असा की भारतीय कर्णधाराने पाकिस्तानी पत्रकाराचा प्रश्न चातुर्याने हाताळला.

