दसरा सणानिमित्त ट्रॅक्टर धुण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जिल्ह्यातील वाळूज परिसरातील गंगापूर तालुक्यातील लिंबे जळगाव येथे आज दुपारच्या सुमारास घडली आहे.
इमरान इसाक शेख हा दसऱ्यानिमित्त आज दुपारी शेतालगत असलेल्या गायरान जमिनीमधील मुरूम उपसल्यानंतर पडलेल्या खड्ड्याच्या पाण्यात ट्रॅक्टर धुण्यासाठी गेला होता. त्याच्यासोबत कुटुंबातील इमू पठाण, जोहान पठाण आणि गौरव तारक ही तीन लहान मुले होती. ट्रॅक्टर धुवून झाल्यानंतर ही तीन लहान मुले आंघोळीसाठी पाण्यात उतरली. अचानक ती मुले बुडत असल्याचं बघून इमरान त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उतरला. मात्र, पाणी जास्तच खोल असल्यामुळे चौघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनाने व मुलांच्या कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दसऱ्याच्या सणादिवशीच मुलांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडल्याने नद्यांना पूर आला आहे. तर, नदी, नाले, ओढे आणि तलावही भरुन वाहत आहेत. त्यामुळेच, वाहत्या पाण्यात जाऊ नका, पाण्याशी खेळू नका असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
मुरूम उपसाच्या खड्ड्यात बुडून या चार मुलांचा मृत्यू झाल्यामुळे गावकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. या घटनेमुळे एक बाब समोर येत आहे. गायरान जमिनीवर सुरू असलेला मुरूम वाहतूक वैद्य आहे की अवैध? आहे याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. हा उपसा अवैध असेल तर याच्यावर कारवाई होणार का? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.



