प्रवाशांच्या फायद्यासाठी, त्यांना सुविधा मिळावी म्हणून भारतीय रेल्वे एक मोठा बदल करणार आहे. या बदलानंतर प्रवाशांना कन्फर्म रेल्वे तिकीटाची तारीख बदलण्याची संधी मिळणार आहे. एवढंच नव्हे तर तिकीटाची तारीख बदलल्यावर कोणतेही कॅन्सलेशन चार्जेसही भरावे लागणार नाहीत. म्हणजे जर तुमच्या योजना अचानक बदलल्या आणि तुम्ही नियोजित तारखेला प्रवास करू शकत नसाल, तर तुम्ही आता त्याच तिकिटाचा वापर करून नंतरच्या तारखेला प्रवास करू शकता. उदा. जर तुमच्याकडे 20 नोव्हेंबर रोजी पुण्याला जाण्यासाठी कन्फर्म तिकीट असेल आणि काही कारणास्तव तुमचा प्लॅन बदलला आणि 5 दिवसांनी पुढे ढकलला गेला, तर तुम्हाला 25 नोव्हेंबरसाठी नवीन तिकीट खरेदी करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या 20 नोव्हेंबरच्या कन्फर्म ट्रेन तिकिटाची तारीख ऑनलाइन बदलू शकाल आणि त्याच तिकिटाने 25 नोव्हेंबर रोजी प्रवास करू शकाल.
याआधी असं नव्हतं. पूर्वी, प्रवाशांना त्यांची तिकिटं रद्द करावी लागायची आणि नवीन तारखेसाठी पुन्हा बुकिंग करावे लागत होते, ज्यामध्ये कॅन्सलेशन चार्जेसही लागायचे तसेच कन्फर्म सीटची कोणतीही हमी नव्हती. मात्र आता, रेल्वेच्या या नवीन बदलामुळे ही समस्या दूर होईल आणि लाखो प्रवाशांना दिलासा मिळेल.
एका रिपोर्टनुसार, आता प्रवासी त्यांच्या कन्फर्म तिकिटांची तारीख ऑनलाइन बदलू शकतील. जर तुम्हाला कोणत्याही कारणास्तव तुमची प्रवासाची तारीख बदलायची असेल, तर तुम्ही तुमचे तिकीट ऑनलाइन पुन्हा शेड्यूल करू शकता. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलास मिळेल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एनडीटीव्हीला या मोठ्या बदलांची माहिती दिली. त्यानुसार, ऑनलाइन कन्फर्म केलेल्या ट्रेन तिकिटाची प्रवास तारीख बदलण्यासाठी कोणतेही पैसे कापले जाणार नाहीत. सध्याच्या प्रणालीमध्ये प्रवासाची तारीख बदलण्याची परवानगी नाही.
रेल्वेमंत्र्यांच्या सांगण्यानुसार, जानेवारीपासून ऑनलाइन तारखेत बदल शक्य होतील. सध्या, तिकीट रद्द करणं आणि प्रवासाची तारीख बदलणं यासाठी मोठा खर्च येतो, ज्यामुळे प्रवास न करताही प्रवाशांच्या खिश्यावर मोठा भार पडतो. ही व्यवस्था योग्य नाही आणि प्रवाशांच्या हिताची नाही, हे रेल्वेमंत्र्यांनी मान्य केलं. त्यामुळे आवश्यक सूचना जारी करण्यात आल्या आहेत आणि बदल केले जात आहेत. त्यामुळे येत्या जानेवारीपासून ऑनलाइन तिकिट प्रवासाची तारीख बदलता येईल असे त्यांनी नमूद केलं.
कन्फर्म तिकीट मिळेलच याची गॅरेंटी नाही
मात्र यामध्ये एक तोटा असा आहे की प्रवासाची तारीख बदलल्यावर पुढच्या तारखेचे तिकीट घेताना, ते कन्फर्म तिकीटच असेल याची काही गॅरेंटी नाही. तिथे उपलब्धतेनुसार तिकिटं मिळतील. तसेच त्या तिकिटाच्या भाड्यात कोणताही फरक असेल तर तो प्रवाशांना सहन करावा लागेल. जे प्रवासी कन्फर्म केलेले ट्रेन तिकिटे बदलू इच्छितात, परंतु रेल्वेकडून त्यांना मोठ्या प्रमाणात शुल्क आकारले जाते अशा प्रवाशांना या बदलामुळे लाखो प्रवाशांना फायदा होईल,बराच फायदा होईलव.
तिकीट रद्द केल्यावर किती पैसे कापले जातात?
जर कोणी एसी फर्स्ट क्लास/एक्झिक्युटिव्ह क्लासचे तिकीट रद्द केले तर त्याला 240 रुपये + जीएसटी भरावे लागते. जर कोणी एसी 2 टियर/फर्स्ट क्लासचे तिकीट रद्द केले तर त्याला 200 रुपये + जीएसटी भरावे लागते. एसी 3 टायर/एसी चेअर कार/एसी 3 इकॉनॉमी तिकीट रद्द करण्यासाठी 180 रुपये + जीएसटी भरावे लागतात. स्लीपर क्लास तिकीट रद्द करण्यासाठी 120 रुपये आणि सेकंड क्लास तिकीट रद्द करण्यासाठी 60 रुपये शुल्क आकारले जाते.




