भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात नुकतीच वनडे मालिका पार पडली. ही मालिका भारताने 1-2 गमावली. असं असलं तरी या मालिकेतील शेवटचा सामना संस्मरणीय झाला. कारण दिग्गज खेळाडू असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी हा सामना जिंकवून दिला. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. कारण 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेसाठी दोन्ही खेळाडू तयारी करत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांचं फॉर्मात असणं गरजेचं आहे. तसाच फॉर्म या दोन्ही खेळाडूंनी दाखवला. खासकरून रोहित शर्माची शतकी खेळीने क्रीडाप्रेमी खूश झाले. त्याचा आक्रमक अंदाज क्रीडाप्रेमींना भावला. वनडे मालिका संपल्यानंतर स्टार फलंदाज रोहित शर्मा मायदेशी परतला आहे. ऑस्ट्रेलियातून मायदेशी परतल्यानंतर मुंबई एअरपोर्टवर त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
हिटमॅन रोहित शर्माची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी गर्दी झाली होती. कारण आपल्या लाडक्या क्रिकेटपटूने ऑस्ट्रेलियात कामगिरीच तशी केली आहे. वनडे मालिकेत मालिकेत मालिकावीराचा आणि शेवटच्या सामनावीराचा पुरस्कार रोहित शर्माने पटकावला. त्यामुळे चाहते त्याच्या कामगिरीने प्रचंड खूश आहेत. वनडे वर्ल्डकप 2027 च्या दृष्टीने वनडे मालिकेतील प्रत्येक खेळी महत्त्वाची आहे. यावेळी मुंबई एअरपोर्टवर चाहत्यांनी त्याला गराडा घातला. रोहित शर्माने चाहत्यांना नाराज केलं नाही. त्यांच्यासोबत सेल्फी काढला. तसेच ऑटोग्राफ दिला.
रोहित शर्माने तीन सामन्यात एकूण 202 धाव केल्या. पहिल्या सामन्यात त्याने फक्त 8 धावा केल्या होत्या. त्यामुळे चाहत्यांची धाकधूक वाढली होती. मात्र दुसऱ्या सामन्यात कमबॅक केलं आणि 73 धावांची खेळी केली. तर तिसऱ्या सामन्यात नाबाद 121 धावा करत संघाला विजय मिळवून दिला. रोहित शर्माला पुन्हा मैदानात पाहण्यासाठी आता काही काळ वाट पाहावी लागणार आहे. पुढच्या महिन्यात दक्षिण अफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात 2 कसोटी, तीन वनडे आणि पाच टी20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारताची वनडे मालिका 30 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. त्यामुळे एक महिना रोहित आणि विराटच्या चाहत्यांना थांबावं लागणार आहे.






