येथील पंचगंगा नदी घाट विकसित करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत आमदार राहुल आवाडे यांच्या प्रयत्नातून राज्य शासनाने 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. प्राप्त निधीतून पंचगंगा नदी घाटाचा विकास होण्यासह तेथील ऐतिहासिक वास्तूंचे जतन होणार आहे.
इचलकरंजी शहरालगतच असलेली व शहराची वरदायीनी असलेल्या पंचगंगा नदीवरील घाट हा संस्थान काळात बांधण्यात आलेला आहे. या घाट परिसरात पुरातन महादेव मंदिर, इचलकरंजीचे जहागिरदार श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे सरकार यांची समाधी, वरद विनायक मंदिर, श्री रेणुका माता मंदिर तसेच सुर्य मंदिर आहे. त्यामुळे याठिकाणी विविध कार्यक्रम व उत्सवामुळे भाविक आणि नागरिकांची सतत वर्दळ असते. इचलकरंजी शहरात पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पंचगंगा नदी घाट हा एक मात्र परिसर आहे. सतत भेडसावणाऱ्या पुरामुळेही घाट परिसराची काही प्रमाणात हानी झाली आहे. त्यामुळे या पंचगंगा नदी घाट परिसराचा विकास करणे आवश्यक आहे. या परिसराच्या विकासामुळे नागरिकांना विरंगुळा ठिकाण होण्यासह येथे असलेल्या पुरातन व ऐतिहासिक वास्तूंचे जतन होणार आहे. त्याचबरोबर येणाऱ्या पिढीला या ऐतिहासिक वास्तूंची माहिती उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पंचगंगा नदी घाट विकसित करणे कामासाठी पर्यटन विभाग अंतर्गत आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात यावा यासाठी आमदार राहुल आवाडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्या अनुषंगाने राज्य शासनाने प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत 2 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच पंचगंगा नदी घाटाचे रुपडे पालटणार आहे.






