आयपीएलच्या 19 व्या मोसमासाठी येत्या काही दिवसात मिनी ऑक्शन होणार आहे. त्याआधी 10 संघांकडून रिटेन्शन यादी जाहीर करण्यात येणार आहे. तर ट्रान्सफर विंडोद्वारे फ्रँचायजीकडे खेळाडूंची अदलाबदली करण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. ट्रेड विंडोद्वारे खेळाडूंची अदलाबदल करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स सज्ज असल्याची चर्चा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सीएसकेला जडेजाच्या जागी राजस्थान रॉयल्समधील संजू सॅमसन पाहिजे.
क्रिकेबझच्या रिपोर्ट्सनुसार, रवींद्र जडेजा आणि संजू सॅमसन या दोघांची किंमत प्रत्येकी 18-18 कोटी आहे. त्यामुळे दोघांची किंमत सारखीच असल्याने थेट अदलाबदल होऊ शकते. मात्र राजस्थान जडेजा व्यतिरिक्त डेवाल्ड ब्रेव्हीस याच्यासाठीही आग्रही आहे. त्यामुळे अजूनही याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही. अशात आता रवींद्र जडेजाच्या अडचणीत वाढ झाली आहे.
चाहत्यांना रवींद्र जडेजा याचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इन्स्टाग्राम अकाउंट सापडत नाहीय. त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आलंय. जडेजाचं इन्स्टा अकाउंट सस्पेंड करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. तसेच स्वत: जडेजानेच अकाउंट डीएक्टीव्ह केल्याचीही चर्चा पाहायला मिळत आहे.
तर दुसऱ्या बाजूला रवींद्र जडेजाचं एक्स (आधीचं ट्विटर) आणि फेसबूक अकाउंट सुरु आहे. मात्र जडेजा फेसबूक आणि एक्सवर फार सक्रीय नसतो.
रवींद्र जडेजा आयपीएल स्पर्धेतील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. तसेच जडेजा अनेक वर्षांपासून चेन्नईचं प्रतिनिधित्व करत आहे. जडेजा 2012 पासून सीएसकेसाठी खेळतोय. तसेच जडेजा सीएसकेवर बंदी असताना कोचीकडून खेळला होता.



