सध्या क्रिकेट चाहत्यांना 2026 सालच्या आयपीएल हंगामाचे वेध लागले आहे. दुसरीकडे आयपीएलमधील संघमालकही कामाला लागले आहेत. आपलाच संघ कसा सर्वशक्तिमान होईल, यासाठी संघमालकांचे प्रयत्न चालू आहेत. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांत खेळाडूंची अदलाबदली करण्यासाठी चर्चा चालू आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान रॉयल्सचा कर्णधार तथा स्टार क्रिकेटपटू संजू सॅमसन याला संघात घेण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जकडून प्रयत्न केले जात आहेत. असे असतानाच आता चेन्नई सुपरकिंग्ज संघाचा सध्याचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या निवृत्तीबाबत माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने मोठा अंदाज व्यक्त केला आहे. त्याने महेंद्रसिंह धोनी आयपीएल मध्येच सोडून जाऊ शकतो, असे कैफने म्हटलंय. त्यानंतर आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.
मोहम्मद कैफने व्यक्त केले भाकित
मिळालेल्या माहितीनुसार चेन्नई सुपरकिंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होऊ शकते. राजस्थान रॉयल्स रविंद्र जडेजा आणि सॅम करन यांच्या बदल्यात संजू सॅमसनला चेन्नई संघाला देण्यास तयार आहे. मात्र हा करार नेमका कुठपर्यंत पोहोचला आहे आणि तो पूर्णत्त्वास जाणार की नाही? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हाच धाका पकडून मोहम्मद कैफ याने त्याच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये महेंद्रसिंह धोनीचा हा शेवटचा आयपीएल हंगाम असू शकतो, असे मत कैफने व्यक्त केले आहे.
…तर धोनी मध्येच संघाचे कर्णधारपद सोडू शकतो
संजू सॅमसन हा चेन्नई सुपरकिंग्ज संघात असावा असे महेंद्रसिंह धोनीला वाटते. सर्वकाही इच्छेप्रमाणे घडून आले तर धोनी आरामात चेन्नई संघापासून दूर होऊ शकतो. कारण चेन्नई संघाचे नेतृत्त्व संजू सॅमसनसारख्या अनुभवी खेळाडूकडे जाईल, असेही मत संजू सॅमसन याने व्यक्त केले आहे. मोहम्मद कैफच्या मतानुसार महेंद्रसिंह धोनी 2022 सालीच चेन्नई संघाचे कर्णधारपद रवींद्र जडेजाकडे सोपवून निश्चिंत होणार होता. परंतु जडेजाला त्याच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत अपेक्षित अशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे धोनीला पुन्हा एकदा संघाचे नेतृत्त्व आपल्याकडे घ्यावे लागले. आता मात्र चेन्नई सुपरकिंग्ज संघाचे कर्णधारपद संजू सॅमसनच्या हाती आले तर महेंद्रसिंह धोनी आयपीएलचा हंगाम मध्येच सोडून चेन्नई संघापासून निवांतपणे दूर हो शकतो, असेही मत मोहम्मद कैफ यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता कैफच्या मताप्रमाणे भविष्यात घडामोडी घडणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


