टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात आपल्याच जाळ्यात फसली. भारताने फिरकीसाठी पोषक अशी खेळपट्टी तयार केली. मात्र भारतावरच हा डाव उलटला. भारताला तिसऱ्या दिवशी पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने भारतावर कोलकातामधील इडन्स गार्डन्समध्ये झालेल्या या सामन्यात 30 धावांनी मात केली. दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 124 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताला हे आव्हानही पूर्ण करता आलं नाही. भारताचा डाव 93 धावांवर आटोपला. दक्षिण आफ्रिकेने यासह भारतात 15 वर्षांनंतर कसोटी सामना जिंकण्याची कामगिरी केली. तसेच दक्षिण आफ्रिकेने या विजयासह 2 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
आता टीम इंडियासाठी दुसरा आणि अंतिम सामना हा करो या मरो आहे. दक्षिण आफ्रिकेकडे सलग दुसरा सामना जिंकून भारतालाच मायदेशात व्हाईट वॉश करण्याची संधी आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेने सामना बरोबरीत सोडवला तरीही तेच मालिका जिंकतील. मात्र भारताला मालिका गमावयची नसेल तर कोणत्याही स्थितीत दुसरा सामना जिंकावा लागेल. मात्र पहिल्या पराभवानंतर भारतीय संघाने जे काय केलंय ते पाहता भारताचा दुसऱ्या सामन्यातही पराभव होईल, असं आता म्हटलं जात आहे.
उभयसंघातील दुसरा कसोटी सामना हा गुवाहाटीतील बारसपारा क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, टीम इंडिया अजूनही कोलकाताच आहे. तसेच टीम इंडिया मंगळवारी इडन गार्डन्समध्ये सराव करणार आहे. त्यामुळे गुवाहाटीतही इडन गार्डन्सप्रमाणे गोलंदाजांचाच दबदबा पाहायला मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच गुवाहाटीतही इडन गार्डन्सप्रमाणेच खेळपट्टी असेल, असाही दावा केला जात आहे.
तर भारताचा पराभव!
दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. आता गुवाहाटीतील खेळपट्टी कशी असणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच. कोलकातात फिरकी गोलंदाजांसाठी मदतशीर ठरलेल्या खेळपट्टीवर फलंदाज ढेर झाले. धक्कादायक म्हणजे गुवाहाटीत फिरकीपटूंच्या हिशोबाने खेळपट्टी तयार केली जाऊ शकते. टीम इंडिया मंगळवारी कोलकातात सराव करणार आहे. त्यावरुन गुवाहाटीतही तशीच खेळपट्टी असल्याचे संकेत मिळत आहेत.
टीम इंडियावर मालिका पराभवाची टांगती तलवार
दरम्यान भारतीय संघावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाची टांगती तलवार आहे. भारताला घरातच काही महिन्यांआधी न्यूझीलंडकडून 0-3 अशा फरकाने मालिका गमवावी लागली होती. त्यामुळे भारताला हा अपमानकारक पराभव टाळायचा असेल तर कोणत्याही स्थितीत दुसरा सामना जिंकावा लागणार आहे.




