बेळगावहून तिरुपतीला जाणाऱ्यांची (Tirupati Darshan Pass) संख्या वाढत चालली आहे. बेळगावसह देशभरातून तिरुपतीच्या दर्शनाला येणाऱ्या भक्तासाठी दर्शन पासची सुविधा केली जाते. दर्शनाचे तिकीट ऑनलाइन पद्धतीने मिळत असल्याने सोय वाढली असली, तरी गेल्या काही महिन्यांत दर्शन पास मिळणे अत्यंत कठीण बनले आहे.
फेब्रुवारी महिन्याचे बुकींग सुरू होताच अवघ्या पंधरा मिनिटांत सर्व तिकीटे ‘फुल्ल’ झाल्याने अनेक भाविक निराश झाले आहेत.
तिरुपती-तिरुमला देवस्थानामार्फत दर महिन्याला दर्शन पास जारी करण्यात येतात. पासची नोंदणी २४ तारखेला खुली (Tirumala Online Booking) होताच हजारोंच्या संख्येने लॉगिन करून स्लॉट बुक करण्यासाठी धाव घेतात. मात्र, फेब्रुवारी महिन्याचे बुकींग सुरू होताच काही क्षणांतच सर्व पास संपले. दर्शनाचे तिकीट मिळविण्यासाठी अनेक महिन्यांपूर्वी भाविक तयारी करत असतात. मात्र, अवघ्या १५ मिनीटात पास संपल्याने नाराजीही आहे.
गत महिन्यात देखील जानेवारी महिन्याचे बुकींग सुरू झाल्यानंतर अवघ्या दहा ते १५ मिनिटांत सर्व पास बुक झाल्याची परिस्थिती होती. त्यानंतर देवस्थानामार्फत दर महिन्यात जारी होणाऱ्या पासची मागणी अतिशय वेगाने वाढत असल्याचे चित्र स्पष्ट झाले. प्रवासाची योजना, निवास व्यवस्था, वाहन बुकींग यांसाठी आधीच खर्च आणि तयारी करणाऱ्या भाविकांना स्लॉट न मिळाल्यामुळे सर्व तयारीवर पाणी फिरत असल्याचे चित्र आहे.
ऑनलाइन बुकींगची वेळ निश्चित असली तरी लाखो भाविक एकाच वेळी वेबसाइटवर लॉगिन करतात. त्यामुळे बुकींग मिळण्याची शाश्वती राहत नाही. पूर्वी ही परिस्थिती नव्हती. दर्शन बुकींग अगदी आरामात मिळत असे. पण मागील काही महिन्यांपासून परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. ऑनलाइन बुकींग सुरू झाल्यानंतर क्षणार्धात हजारो स्लॉट बुक होत आहेत. अनेकांच्या मते ही परिस्थिती समजण्यापलीकडची असून दहा मिनिटांत इतका मोठा आकडा कसा पूर्ण होतो? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ज्यांना पास मिळालेले नाहीत, त्यांना आता मार्च महिन्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. अन्यथा दर्शन पास नसतानाही मोफत दर्शन रांगेत थांबून दर्शन घ्यावे लागेल. मोफत दर्शनात रांग मोठी असून प्रतीक्षा वेळ पंधरा ते वीस तासांपर्यंत जात असल्याने वृद्ध, लहान मुले आणि आजारी व्यक्तींना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.
बेळगावातून तिरुपतीकडे जाणाऱ्या भाविकांचे प्रमाण वर्षभर मोठे असते. शाळा-कॉलेजच्या सुट्ट्या, शनिवार-रविवार, तसेच खास मुहूर्ताच्या दिवसांमध्ये या गर्दीत आणखी वाढ होते. तिरुमला देवस्थानाने हजारो पास उपलब्ध केले तरी मागणी लाखोंमध्ये असल्याने उपलब्धता अत्यंत कमी पडत आहे. सध्याच्या स्थितीत तिकीट मिळालेले प्रवासी समाधानी असले तरी बहुसंख्य भाविकांसाठी तिरुपती दर्शन पास मिळणे ‘अतिशय कठीण’ झाले आहे.



