पुण्यात एका महिलेने पुरुषावर गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कोल्हापूर येथील ३७ वर्षीय व्यक्तीने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत गौरी वांजळे या महिलेने स्वतःला वकील असल्याचे सांगत त्याला धमकावल्याचा गंभीर आरोप केला आहे.
फिर्यादीच्या म्हणण्यानुसार, आरोपी महिलेने त्याला गुंगीचे औषध देऊन बळजबरी केली आणि त्याचे अश्लील फोटो काढून पैशांची मागणी सुरू केली.
एवढेच नाही, तर पुण्यातील आपल्या राहत्या घरी तसेच कोल्हापूरमधील पीडिताच्या घरी जाऊनही अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आल्याची माहिती दिली आहे.तक्रारीत असेही नमूद आहे की, आरोपी महिलेने त्या पुरुषाला जबरदस्तीने काशी विश्वनाथ येथे नेऊन त्याच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
पीडितावर मानसिक दबाव आणून पैसे उकळण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही समोर आले आहे. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी गौरी वांजळे विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.


