बिग बॉस मराठी सिझन पाचचा विजेता सूरज चव्हाण आज बोहल्यावर चढणार आहे. त्याचे लग्न संजना गोफणेशी होणार आहे. अगदी गरीब कुटुंबातून आलेला, हालाकीच्या परिस्थिती मोठा झालेला, डोक्यावर आई-वडीलांचा हात नसलेला, साध्यासरळ स्वभावाच्या सूरज चव्हाण यशाच्या शिखरावर आहे. आज त्याच्याकडे सर्व काही आहे. पण सूरजचे आई-वडील तो लहान असतानाच वारले. सूरजच्या लग्न सोहळ्यातील व्हिडीओ पाहून अनेकांना त्यांची आठवण आली आहे.
सूरज चव्हाण आणि संजना गोफणे यांचा आज 29 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी लग्न सोहळा आहे. या लग्नाला फिल्म इंडस्ट्रीमधील अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहणार आहेत. तसेच राजकीय मंडळी देखील हजर राहणार असल्याचे बोलले जात आहे. सूरजच्या गेस्ट लिस्टमध्ये बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता सूरज चव्हाणचा देखील समावेश असल्याचे पाहायला मिळाले. आता कोणते कोणते कलाकार सूरजच्या लग्नाला येणार हे पाहण्यास सर्वजण उत्सुक आहेत.
सूरजच्या लग्नापूर्वीच्या सोहळ्यांचे व्हिडीओ
लग्नापूर्वी सूरजच्या मेहंदी, हळदी समारंभाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओंमध्ये सूरजच्या लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात झाल्याचे दिसत आहे. एका व्हिडीओमध्ये सूरजच्या हातावर मेहंदी काढण्याचा कार्यक्रम सुरु आहे. तर दुसऱ्या व्हिडीओमध्ये घाणा-बांगड्या समारंभाचा व्हिडीओ दिसत आहे. सूरजने लग्नापूर्वीच्या कार्यक्रमांना सुरुवात करण्यापूर्वी आई-वडिलांच्या फोटोला हार घालून आशिर्वाद घेतला आहे. त्याचे हे क्षण पाहून अनेकजण भावून झाले आहेत.
नेटकरी झाले भावूक
सोशल मीडियावर सूरजच्या लग्नापूर्वीच्या समारंभाचे व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने आज आई वडील असते तर हे पाहून किती खूष झाले असते अशी कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एका यूजरने सूरज तुझी आई आज पाहिजे होती रे असे भावूक अंदाजात म्हटले आहे. बाकी इतर यूजर्सने सूरजवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. सूरजचा लग्न सोहळा आज संध्याकाळी 6.11 मिनिटांनी पुण्याजवळील सासवडमध्ये धुमधडाक्यात पार पडणार आहे. आता सूरजच्या लग्न सोहळ्याती फोटो पाहण्यासाठी सर्वजण आतुर आहेत.





