भारत आणि दक्षिण आफ्रिका (India vs South Africa) यांच्यातील लखनौला होणारा चौथा टी२० सामना धुक्यामुळे रद्द करण्यात आला. एकही चेंडूचा खेळ न होता सामना रद्द करण्यात आले.
अटल बिहारी स्टेडियमवर जमलेले हजारो चाहते अत्यंत निराश झाले. लखनौ टी२० रद्द झाल्यामुळे चाहते खूप नाराज आहेत आणि सोशल मीडियावर बीसीसीआयवर सतत टीका केली जात आहे. याचदरम्यान, बीसीसीआयने या मुद्द्यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयने अप्रत्यक्षपणे आपली चूक मान्य केली आहे. माध्यमांशी बोलताना बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले की, भविष्यात ते उत्तर भारतातील हवामान लक्षात घेऊन स्पर्धा किंवा मालिकांचे सामने ठरवण्यावर लक्ष देतील.
राजीव शुक्ला काय म्हणाले ?
एएनआयशी बोलताना राजीव शुक्ला यांनी कबूल केले की लखनौ टी-२० रद्द झाल्यामुळे चाहते खूप संतापले होते. त्यांनी आश्वासन दिले की बीसीसीआय आता टीम इंडियाच्या सामन्यांच्या वेळापत्रकाचा आढावा घेईल. १५ डिसेंबर ते १५ जानेवारी दरम्यान होणारे सामने उत्तर भारताऐवजी पश्चिम भारतात होतील. हे लक्षात घेण्यासारखे आहे की या काळात उत्तर भारतात प्रचंड थंडी असते आणि धुक्यामुळे अनेकदा दृश्यमानता कमी होते. प्रदूषण हादेखील याचा एक प्रमुख घटक आहे.
राजीव शुक्ला म्हणाले, ” धुक्यामुळे सामना रद्द करावा लागला. लोक खूप संतापले होते. १५ डिसेंबर ते १५ जानेवारी या कालावधीत सामने दुसरीकडे आयोजित करण्याचा विचार करावा लागेल. आम्ही ते उत्तर भारताऐवजी पश्चिम भारतात हलवण्यावर चर्चा करू. धुक्यामुळे देशांतर्गत सामने देखील प्रभावित झाले आहेत, ही एक गंभीर समस्या आहे. ”
चाहत्यांना त्यांचे पूर्ण पैसे परत का मिळणार नाहीत?
बीसीसीआयने टी२० मालिकेचे वेळापत्रक तयार करताना उत्तर भारतातील भौगोलिक परिस्थितीकडे दुर्लक्ष केले आणि परिणामी लखनौमधील चाहत्यांना टी२० सामना पाहण्याची संधी मिळाली नाही. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ज्या चाहत्यांनी तिकिटे खरेदी करण्यासाठी हजारो रुपये खर्च केले त्यांना त्यांचे पूर्ण पैसे मिळणार नाहीत. त्यांच्या तिकीटाच्या पैशातून बुकिंग फी कापून उरलेली रक्कम त्यांना परत केली जाणार आहे.





