इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण झाली. महिनाभर ही प्रक्रिया सुरू होती. यामध्ये महापालिकेतील बहुतांश अधिकारी व कर्मचारी या कामात व्यस्त होत.
निवडणूक संपल्यानंतर मात्र सर्वजण आपापल्या मूळ कामाची जबाबदारी पार पडण्यासाठी पुन्हा सक्रिय झाले.पण आता पुन्हा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी महापालिकेतील ३४ अधिकारी – कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.
त्यामुळे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन्हीकडील कामकाज सांभाळताना कसरत होत आहे. महिनाभर अपवाद वगळता महापालिकेतील बहुतांशी विभागाचे कामकाज ठप्प झाले होते.
त्यामुळे नागरिकांची कामे तर खोळंबली आहेतच, पण त्याशिवाय अनेक विभागाची कामे प्रलंबित राहिली आहे. ती कामे पूर्वपदावर आणण्यासाठी निवडणूक संपल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची तारांबळ सुरू झाली आहे.
महापौर व अन्य पदाधिकारी निवडी येत्या काही दिवसांत होणार आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कामकाजात अधिक गती येणार आहे. निवडणुकीपूर्वी अनेक कामांचे कार्यादेश देण्यात आले आहे. त्या कामांना प्रारंभ होणार आहे.
या सर्व कामांचा वेळेत निपटारा करण्याची जबाबदारी प्रशासनावर आली आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना काही अधिकारी, वरिष्ठ लिपिक, लिपिक आदी ३४ कर्मचाऱ्यांची जिल्हा परिषद निवडणुकीसाठी नियुक्ती केली आहे.
त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांची कसरत होत आहे. दोन्हीकडील कामे मार्गी लावताना तारांबळ उडत आहे. महत्त्वाची जबाबदारी असणारे अधिकारी व कर्मचारी नसल्यामुळे पुढील काही दिवस प्रशासकीय कामकाज ठप्प होण्याची भीती आहे.
कर्मचाऱ्यांचा तुटवडा, कामकाजात शिथिलता महापालिका झाल्यानंतर पुरेसा कर्मचारी वर्ग उपलब्ध झालेला नाही. अनुकंपा भरतीमुळे अंशतः दिलासा मिळाला आहे. पण अद्यापही अनेक पदे रिक्त आहेत. ती अद्याप भरलेली नाहीत. अधिकाऱ्यांची मांदियाळी आहे.
पण प्रत्यक्षात प्रशासकीय कामकाज गतीने करण्यासाठी आवश्यक कर्मचारीच नाही. त्यामुळे अनेक कामे वेळेवर होत नसल्याचा अनुभव सर्वांनाच येत आहे. विविध विभागाची जबाबदारी एकाच अधिकारी अथवा कर्मचारी यांच्यावर सोपविण्यात येत आहे. त्यामुळेही कामकाजात शिथिलता येत आहे.




