Monday, February 9, 2026
Homeब्रेकिंगविद्यार्थ्यांनो, घाबरू नका! बोर्डानेच दिले उत्तरपत्रिका लेखनाचे मार्गदर्शन,व्हिडिओमध्ये उघड

विद्यार्थ्यांनो, घाबरू नका! बोर्डानेच दिले उत्तरपत्रिका लेखनाचे मार्गदर्शन,व्हिडिओमध्ये उघड

बोर्डाची परीक्षा म्हटल्या की, विद्यार्थी आणि पालकांच्या मनात धास्ती आणि अभ्यासाचा प्रचंड ताण हे समीकरण ठरलेले असते. मात्र, यंदा ही भीती दूर करण्यासाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर आणि कोकण विभागीय मंडळाने अभिनव प्रयोग राबवला आहे.

 

‘बोर्डाचे काम केवळ परीक्षा घेणे आणि निकाल लावणे एवढेच नाही, तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवणे ही देखील आमची जबाबदारी आहे,’ हे सिद्ध करत या दोन्ही मंडळांनी संयुक्तपणे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘विषयनिहाय मार्गदर्शन व्हिडिओ’ मालिका प्रसिद्ध केली आहे.

 

अभ्यास पूर्ण झालेला असला तरी, उत्तरपत्रिका नेमकी कशी लिहावी? याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम असतो. केवळ पाठांतर करून चालत नाही, तर परीक्षेच्या तीन किंवा ठरलेल्या तासांत ते ज्ञान कागदावर कसे उतरवायचे, याचे कौशल्य महत्त्वाचे असते.

 

ते लक्षात घेवून मंडळाने व्हिडिओ तयार केले आहेत. या माध्यमातून तज्ज्ञ मार्गदर्शक थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहेत. तांत्रिक बाबी समजणे सोपे जाते. आकृत्या, नकाशे आणि गणितातील स्टेप्स प्रत्यक्ष स्क्रीनवर पाहिल्यामुळे लक्षात राहतात. सकारात्मक संवादामुळे विद्यार्थ्यांवरील मानसिक दडपण कमी होण्यास मदत होते.

 

उत्तरपत्रिका लेखनाचे बारकावे, प्रश्ननिहाय उत्तरे लेखनाची काळजी आणि वेळेचे नियोजन यावर या व्हिडिओ मालिकेचा मुख्य भर आहे. प्रत्येक विषयाची प्रकृती वेगळी असते. गणितात पायऱ्यांना महत्त्व आहे, तर भाषेत शुद्धलेखन आणि सादरीकरणाला.

 

विज्ञानात नामनिर्देशित आकृत्या कशा काढाव्यात आणि भूगोलात नकाशापूर्ती कशी करावी, याचे सूक्ष्म मार्गदर्शन यात दिले आहे. बोर्डाचा पेपर लिहिताना अनेकदा शेवटचे प्रश्न वेळेअभावी सुटतात.

 

हे टाळण्यासाठी कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यावा, घड्याळाशी सांगड कशी घालावी आणि शेवटची दहा मिनिटे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी कशी वाचवावीत, याचे ‘टाईम मॅनेजमेंट’ सूत्रही या व्हिडिओतून उलगडले आहे. लास्ट मिनिट रिव्हिजन…

 

विभागीय मंडळाने दहावीच्या प्रमुख आठ विषयांचे आणि बारावीच्या तेरा महत्त्वाच्या विषयांचे व्हिडिओ तयार केले आहेत. त्यात दहावीच्या मराठी, इंग्रजी, हिंदी, बीजगणित, भूमिती, विज्ञान, इतिहास व भूगोल या विषयांचा समावेश आहे.

 

बारावीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित व संख्याशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, पुस्तकपालन व लेखाकर्म, वाणिज्य संघटन, चिटणीसाची कार्यपद्धती, अर्थशास्त्र, इतिहास व भूगोल या विषयांचे व्हिडिओ आहेत.

 

बारावीची परीक्षा १० फेब्रुवारीपासून आणि दहावीची २० फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर हे व्हिडिओ विद्यार्थ्यांसाठी ‘लास्ट मिनिट रिव्हिजन’ चे काम करणार आहेत.

 

राज्यात पहिल्यांदाच प्रयोग

 

साधारणपणे बोर्ड परीक्षेच्या काळात खासगी क्लास किंवा व्यावसायिक संस्थांचे मार्गदर्शन पाहिले जाते. परंतु, कोणत्याही व्यावसायिक बाबींचा स्पर्श होऊ न देता, खुद्द बोर्डानेच तज्ज्ञ शिक्षकांच्या मदतीने हे ‘डिजिटल शस्त्र’ विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे. कोल्हापूर विभागीय मंडळाच्या कार्यालयात या सर्व व्हिडिओंचे चित्रीकरण पूर्ण झाले आहे.

 

आता हे व्हिडिओ ”SSCHSC DIVISIONAL BOARD KOLHAPUR” या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील शैक्षणिक आराखड्याचा हा एक महत्त्वाचा भाग आहे.

 

विभागीय मंडळाने उचललेले हे पाऊल विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणारे आहे. त्यामुळे परीक्षेबाबतची भीती कमी होऊन विद्यार्थी आनंदाने आणि तयारीने परीक्षेला सामोरे जातील, अशी खात्री आहे. हे व्हिडिओ युट्युब वर असल्याने कोल्हापूर आणि कोकण मंडळाच्या या प्रयोगाचा फायदा राज्यभर होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -