तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यूबाबत आता अनेक शंका व्यक्त केल्या जात आहेत. शरद पवार यांच्या पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन खळबळजनक दावे केले होते. दरम्यान, आता अजितदादा ज्या विमानातून प्रवास करत होतो, त्या अपघातग्रस्त विमानाचा ब्लॅकबॉक्स जळालेल्या स्थितीत असल्याचे सांगिले जात आहे. या ब्लॅकबॉक्समधील माहिती संकलनासाठी तो परदेशात पाठवला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. ही माहिती समोर येताच आमदार रोहित पवार यांनी हादरवून टाकणारं भाष्य केलं आहे. त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक पोस्ट करून अजितदादांसोबत घातपात झाल्याच्या संशयाला बळ मिळाले असल्याचे अप्रत्यक्षपणे सांगितले आहे. सोबतच त्यांनी दोन दिवसांत आणखी एक पत्रकार परिषद घेऊन धक्कादायक खुलासे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
रोहित पवार यांनी नेमका काय दावा केला?
अजितदादांची किंमत सर्वसामान्य नागरिकांना समजली पण अजून तपास यंत्रणांना मात्र समजलेली दिसत नाही. दुर्दैवी अपघातानंतर २० दिवस झाले पण अजूनही तपासाला वेग आला नाही, असा संताप रोहित पवार यांनी व्यक्त केला. तसेच केवळ VSR कंपनीला पुरावे नष्ट करता यावे म्हणून तर उशीर होत नाही ना? असा गंभीर प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कंपनीला कुणाचा वरदहस्त आहे, हा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. आज ब्लॅक बॉक्स खराब झाल्याबाबत जी काही माहिती समोर येत आहे त्यावरून मी ५ दिवसांपूर्वी वर्तवलेली शक्यता खरी होताना दिसत आहे, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली. आम्ही मात्र दादांचा अपघात की घात याचे उत्तर मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. दोन दिवसात पुन्हा पत्रकार परिषदेत भेटू असे सांगून त्यांनी आणखी काही धक्कादायक खुलासे करणार असल्याचे सूतोवाच केले आहे.
रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत काय मागणी केली होती?
दरम्यान. अजितदादांचा अपघात नव्हे तर नियोजित अपघात आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केला होता. तसेच अजितदादांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी, परदेशी तपास संस्थांकडे या घटनेचा तपास द्यावा, असी मागणीही रोहित पवार यांनी केली होती.





