Wednesday, June 3, 2026
Homeमहाराष्ट्रधो-धो कोसळला… राज्याच्या या भागाला मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान

धो-धो कोसळला… राज्याच्या या भागाला मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं; वादळी वाऱ्यामुळे प्रचंड नुकसान

संपूर्ण देश सध्या मान्सूनच्या प्रतीक्षेत आहे, अशातच आज राज्याच्या विविध भागात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला असला तरी अनेक भागात मोठे नुकसान झाले आहे. आज हिंगोली जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी पहायला मिळाली. जिल्हातील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस कोसळला. यामुळे शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे.

 

वाशिमच्या मालेगावात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी

वाशिमच्या मालेगाव तालुक्यात आज वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली. मालेगाव शहरासह तालुक्यातील अनेक भागांत पावसाचा जोर पहायला मिळाला. वादळी वाऱ्यामुळे काही काळ नागरिकांची तारांबळ उडाली तर अनेक वाहनचालकांना वाहने थांबवावी लागली. या पावसामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 

वाशिम तालुक्यातील ढिल्ली गावाला वादळी पावसाचा तडाखा बसला. जोरदार वाऱ्यामुळे डीपी कोसळली, तसेच विजेचे काही खांब उन्मळून पडले. घरांवरील व कोठ्यांवरील पत्र्यांचे नुकसान झाल्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच वाशिमच्या कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात वादळी वाऱ्यासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. या मान्सूनपूर्व पावसाने उकाड्यापासून त्रस्त असलेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे शेती मशागतीच्या कामांना गती मिळणार आहे.

 

परभणीच्या काही भागात पावसाचा कहर

परभणीच्या इंदेवाडी शिवारात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती. वादळी वाऱ्यामुळे घराची भिंत कोसळल्याने भिंतीखाली चिरडून 11 वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दिपाली नंदगे (वय 11) असं मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

 

जळगावातही मान्सूनपूर्व पावसाची हजेरी

जळगावमध्ये वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. वादळी वारा व विजांच्या कळकटाटासह जळगाव शहरात तब्बल अर्धा तासापर्यंत मुसळधार पाऊस पडला. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे घरी परतणाऱ्या चाकरमान्यांची धांदल उडाली. जळगाव शहरासह जिल्ह्यातील काही भागांमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळल्याची माहिती समोर आली आहे.

 

गोंदियाला ऑरेंज अलर्ट

नवतपाच्या सुरुवातीच्या पाच दिवसांत गोंदिया जिल्ह्यात उष्णतेने कहर केला होता. मात्र मान्सूनपूर्व पावसामुळे तापमानात लक्षणीय घट झाली असून रविवारी कमाल तापमान 39.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्यामुळे नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, हवामान विभागाने आज गोंदिया जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता वर्तवली आहे. उद्यापासून यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -