भंडारा जिल्ह्यातील दोन लहान मुलीना भर रात्री अंधारात रस्त्यावर उतरवल्याच्या प्रकरणात एसटी महामंडळाने मोठी कारवाई केली आहे. भंडारा आगारातून प्रवास करणाऱ्या 2 अल्पवयीन विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात रोहा येथे रस्त्यावर उतरविणाऱ्या चालक आणि वाहकाला तातडीने निलंबित करण्यात आले आहे. या घटनेमुळे सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
नेमकी घटना काय घडली होती?
14 नोव्हेंबर 2026 रोजी भंडारा आगाराची ST बस 2 अल्पवयीन विद्यार्थिनींना घेऊन मुंढरीच्या दिशेने जात होती. रात्रीच्या वेळी ही बस रोहा येथे पोहोचली. रोहा ते मुंढरी या पुढच्या प्रवासात बसमध्ये या दोघींशिवाय अन्य प्रवासी नव्हते. त्यामुळे चालक आणि वाहकाने विद्यार्थिनींना त्यांच्या नियोजित गावापर्यंत नेण्याऐवजी रोहा येथेच रात्रीच्या अंधारात उतरविले. या प्रकारामुळे मुलींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला. घटनेची माहिती स्थानिक नागरिक आणि माध्यमांपर्यंत पोहोचल्यानंतर एसटी प्रशासनाच्या कारभारावरही दांडगा प्रश्न उपस्थित झाले.
एसटी प्रशासनाने काय कारवाई केली?
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एसटी प्रशासनाने प्राथमिक चौकशी सुरू केली. भंडारा विभाग नियंत्रक आणि आगार व्यवस्थापक यांच्यामार्फत या प्रकरणाची माहिती घेण्यात आली. चौकशीत संबंधित बसचे चालक अनिल सावरे आणि वाहक उद्धव मेश्राम यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली. त्यानंतर 16 नोव्हेंबरपासून दोघांनाही एसटी सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला. महामंडळाच्या शिस्त आणि अपील कार्यपद्धतीनुसार त्यांच्याविरुद्ध पुढील कारवाईही सुरू करण्यात आली आहे.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा कठोर इशारा
माध्यमांमधून घटनेची माहिती मिळताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने चौकशी करण्याचे निर्देश दिले. प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेषतः शाळकरी विद्यार्थिनींना त्यांच्या घरापर्यंत सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी एसटी कर्मचाऱ्यांची आहे. भविष्यात अशा प्रकाराची पुनरावृत्ती झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फ करण्याचा इशाराही मंत्र्यांनी दिला आहे.
या घटनेनंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षित प्रवासासाठी एसटी प्रशासनाने स्पष्ट सूचना आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे. केवळ बसमध्ये अन्य प्रवासी नसल्यामुळे विद्यार्थिनींना अर्ध्या रस्त्यात उतरविणे अतिशय चुकीचे आहे, हा मुद्दा या कारवाईतून पुन्हा समोर आला आहे.
