इचलकरंजी : राज्य सरकारने जाहीर केलेले वृत्तपत्र विक्रेता कल्याणकारी मंडळ तातडीने कार्यान्वित करावे. विक्रेत्यांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक स्थैर्य मिळेपर्यंत संघटनेचा लढा सुरूच राहील, असा निर्धार पुरोगामी वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे सचिव अण्णा गुंडे यांनी व्यक्त केला.
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त संघटनेच्या सेंटरवर वृत्तपत्र विक्रेता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सभासद सतीश कांबळे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.
वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कल्याणकारी मंडळासाठी गेल्या १७ वर्षांपासून अनेक ज्येष्ठ विक्रेत्यांनी संघर्ष केला आहे. मात्र, मंडळाची प्रत्यक्ष अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याने विक्रेत्यांच्या आर्थिक आणि व्यावसायिक अडचणी कायम आहेत. या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ विक्रेत्यांच्या संघर्षाचा सन्मान राखत मंडळ कार्यान्वित होण्यासाठी प्रत्येक आंदोलनात विक्रेत्यांनी एकजुटीने सहभागी व्हावे, असे आवाहन गुंडे यांनी केले.बालपणी शिक्षणासाठी वृत्तपत्र वितरणाचे काम केलेल्या डॉ. कलाम यांच्या जयंतीदिनी वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला जातो. यानिमित्त विविध दैनिकांच्या प्रतिनिधींनी विक्रेत्यांना शुभेच्छा दिल्या. पेढे वाटप करण्यात आले. दैनिक पुढारीच्या वतीने मसाले दुधाची पाकिटे देण्यात आली, तर संघटनेने चहा-नाश्त्याची व्यवस्था केली.
यावेळी वृत्तपत्र प्रतिनिधी सर्जेराव कातिवले, सिराज भोरे, फिरोज माणियार, सुभाष जगताप, अनिकेत कोईगडे, मिलिंद फुले, सुभाष बुर्गे, रोहित किटवाडकर, विजय वाईगडे यांच्यासह संघटनेचे संचालक आणि वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते.
