इचलकरंजी : एकीकडे संभाव्य दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविण्याची धडपड सुरू असताना, दुसरीकडे शहरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्येच पाणीचोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. दातार मळा, दत्त कॉलनी आणि गुरुकन्नन नगर परिसरात तब्बल १९ अनधिकृत नळजोडण्या आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शुक्रवारी या जोडण्या तोडल्या. मात्र, केवळ नळजोडण्या तोडून पाणीचोरांना अभय देणार की त्यांच्यावर फौजदारी गुन्हेही दाखल करणार, असा सवाल उपस्थित होत आहे.
इचलकरंजी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून शहरातील अनधिकृत नळजोडण्यांचा शोध घेण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेत दातार मळा परिसरात पाच, दत्त कॉलनीत नऊ, तर गुरुकन्नन नगरमध्ये पाच अनधिकृत नळजोडण्या आढळल्या. यापैकी दातार मळा आणि दत्त कॉलनी परिसरातील जोडण्या कूपनलिकांवरून घेतल्याचे समोर आले आहे. एकूण १९ जोडण्या तोडून महापालिकेने कारवाई केली. परिसरात आणखी ५० हून अधिक अनधिकृत नळजोडण्या असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. या तक्रारींची सत्यता तपासून महापालिका प्रशासनाने व्यापक तपासणी करणे आवश्यक आहे. शनिवारपासून पुन्हा या भागात पाणीपुरवठा विभागाकडून आणखी कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते.संभाव्य दुष्काळाचे संकट समोर असताना इचलकरंजीकरांना पाणी वाचवण्याचे आवाहन केले जात आहे तर दुसरीकडे पाण्याची चोरी करणाऱ्यांवर केवळ जोडण्या तोडण्यापुरती कारवाई न करता, संबंधित कायद्यानुसार दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिकांतून होताना दिसत आहे
चौकट
टुमदार बंगल्यांत पाणीचोरी, कारवाईचा बडगा फक्त नळ तोडण्यापुरताच?
दातार मळा आणि दत्त कॉलनी या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये टुमदार बंगल्यांत अनधिकृत नळजोडण्या आढळल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पाण्याची मुबलक उपलब्धता असतानाही नियम धाब्यावर बसवून पाणी मिळविण्याचा हा प्रकार असेल, तर सर्वसामान्य नागरिकांनी पाणीटंचाईच्या काळात नियमांचे पालन का करावे, असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधितांवर नियमानुसार पाणीचोरीचे गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
