जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यात विविध ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागांत पावसाने विश्रांती घेतली होती.
मात्र, आता हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल होण्याचे संकेत मिळत असून, राज्यात पावसाचे पुनरागमन होणार आहे. 13 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली आहे.
हवामान विभागाने जाहीर केलेल्या नव्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत राज्यातील विविध विभागांमध्ये जोरदार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. विशेषतः 13 ते 20 ऑगस्ट दरम्यान विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकण या पट्ट्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद होऊ शकते. त्यानंतर 20 ते 27 ऑगस्ट दरम्यानही राज्यातील विविध भागांत पावसाची संततधार कायम राहण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजामुळे शेतकरी वर्गासह नागरिकांमध्ये दिलासा पाहायला मिळत आहे. सध्या आकाशात चक्राकार वारे वाहत असून, यामुळे पश्चिम बंगालची किनारपट्टी आणि वायव्य बंगालच्या उपसागरात पुढील चोवीस तासांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याचा इशारा देण्यात आला आहे. या हवामान बदलाचा थेट परिणाम महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांच्या हवामानावर होणार आहे.
देशातील इतर राज्यांतही मुसळधार पावसाचा इशारा
फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशातील इतरही काही राज्यांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. ओडिशाच्या काही भागांमध्ये अतिशय मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज असून हवामान विभातने सतर्कतेचा इशारा दिला आहे. याशिवाय केरळ, कर्नाटकची किनारपट्टी आणि दक्षिण भाग, पूर्व मध्यप्रदेश आणि पूर्व राजस्थान या राज्यांमध्येही मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. यासोबतच मध्य महाराष्ट्र, बिहार, छत्तीसगड, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, आसाम आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
महाबळेश्वरमध्ये पावसाची दमदार हजेरी
राज्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये पावसाची जोरदार बॅटींग सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वरमध्ये तब्बल 82.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. विशेष म्हणजे, चालू मान्सून हंगामात आतापर्यंत महाबळेश्वरमध्ये एकूण 5 हजार 16 मिलीमीटर एवढा प्रचंड पाऊस नोंदवला गेला आहे.
पावसाच्या या नव्या स्पेलमुळे रखडलेल्या शेतीकामांना गती मिळण्याची शक्यता असून, धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ होण्यास मदत होणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजामुळे प्रशासनानेही सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.


