शेतकऱ्यांना कर्जमाफीचे दिलेले वचन पूर्ण केल्यानंतर आता महायुती सरकारने राज्यातील बळीराजासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
कागल नगरीत आयोजित विविध विकासकामांच्या लोकार्पण सोहळा आणि शेतकरी मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. राज्य शासनाने आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला असून, यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला ‘थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र’ देखील दिले जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज दिली जाणार आहे.
100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज
शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी सौर कृषी वाहिनी योजनेला गती देण्यात आली असून, सध्या 74 टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत आहे. यावर्षाअखेर 90 टक्के आणि पुढील वर्षी 100 टक्के शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
शेतकरी कर्जमाफीबाबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शेतकऱ्यांना दिलेले वचन पूर्ण करून आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी देण्यात आली असून, 56 हजार शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यासाठी शासन दरवर्षी 25 हजार कोटी रुपये खर्च करीत असून, 58 हजार कोटी रुपयांची थकबाकीही शासनाने दिली आहे. आता प्रत्येक शेतकऱ्याला थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
साखर उद्योग आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी इथेनॉल धोरण महत्त्वाचे असून, इथेनॉलशिवाय साखर कारखानदारी टिकवणे अवघड आहे, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचे नुकसान होत असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर होत असल्या तरी, त्याबाबत पेट्रोलियम किंवा वाहन उत्पादक कंपन्यांकडे कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. इथेनॉल धोरणामुळे साखर कारखानदारी टिकून राहिली असून, ऊस उत्पादकांना एफआरपी देणे शक्य झाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एफआरपीचे नवे उच्चांक गाठले गेले असून, त्याचा लाभ ग्रामीण अर्थव्यवस्थेला आणि शेतकऱ्यांना झाला आहे.
साखर कारखानदारी अधिक सक्षम करण्यासाठी ‘झिरो वेस्ट’ संकल्पनेतून स्पेंट वॉश आणि प्रेस मडपासून सीबीजी व सीएनजी निर्मिती करण्यात येणार आहे. या उपउत्पादनातून मिळणारा अतिरिक्त निधी कारखान्यांची आर्थिक स्थिती मजबूत करण्यासह शेतकऱ्यांच्या एफआरपीसाठी उपयोगात आणला जाणार आहे. देशातील पहिला एकत्रित सीबीजी प्रक्रिया प्रकल्प कोल्हापूर जिल्ह्यात उभारण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.


