विद्यार्थ्यांचा अभ्यास अधिक सोपा, वैयक्तिक आणि तंत्रज्ञानाधारित करण्यासाठी गुगलने एआयवर आधारित अनेक नवीन सुविधा जाहीर केल्या आहेत. NEET, JEE, GRE, SAT, AP आणि MCAT या सारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या टूल्सच्या माध्यमातून अभ्यास, सराव आणि विषय समजून घेण्यास मदत होणार आहे.
विशेष म्हणजे, 140 हून अधिक देशांतील कॉलेज विद्यार्थ्यांसाठी Google ने मोफत AI सब्सक्रिप्शनची घोषणा केली आहे.
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा
अल्फाबेटचे (Alphabet) सीईओ सुंदर पिचाई यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे गुगलच्या नव्या शैक्षणिक AI सुविधांची माहिती दिली. गुगल सर्च, जेमीनी, युट्युब आणि इतर एज्युकेशन टूल्सच्या मदतीने विद्यार्थी आपल्या गरजेनुसार अभ्यास करू शकतील.
NEET, JEE पासून SAT, GRE, LSAT आणि MCAT पर्यंत विविध परीक्षांच्या तयारीसाठी गुगलची AI टूल्स वापरता येणार आहेत. विद्यार्थ्यांना अवघड विषय समजून घेणे, प्रश्नांचा सराव करणे आणि अभ्यासाचे नियोजन करणे यासाठी AI ची मदत मिळेल.
भारतीय विद्यार्थ्यांसाठी 12 महिन्यांचे मोफत AI सब्सक्रिप्शन
भारतामधील पात्र कॉलेज विद्यार्थ्यांना 12 महिन्यांसाठी गुगल एआय प्लस (Google AI Plus) मोफत देण्यात येणार आहे. यामध्ये Gemini Omni चा वापर, Gemini च्या वापरासाठी वाढीव मर्यादा आणि 400 GB स्टोरेज यांसारख्या सुविधा मिळतील.
अमेरिकेतील पात्र विद्यार्थ्यांना एक वर्षासाठी गुगल एआय प्रो (Google AI Pro) मोफत मिळणार आहे. अमेरिकेबाहेरील पात्र विद्यार्थ्यांसाठी गुगल एआय प्लसची सुविधा उपलब्ध असेल. याशिवाय AI Pro आणि YouTube Premium चे सबस्क्रिप्शन घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 70 टक्क्यांपर्यंत सवलत मिळू शकते.
‘स्टुडंट हब’मुळे अभ्यास आणखी सोपा
गुगलने विद्यार्थ्यांसाठी स्टुडंट हब (Student Hub) नावाचे नवीन फीचर आणले आहे. यात विद्यार्थी अभ्यासाच्या नोट्स, फ्लॅशकार्ड, ग्राफ, इमेज आणि इंटरॅक्टिव्ह व्हिज्युअल तयार करू शकतील. त्यामुळे केवळ मजकूर वाचण्याऐवजी वेगवेगळ्या माध्यमातून विषय समजून घेणे शक्य होईल.
जेमीनी डीप रिसर्च (Gemini Deep Research) मध्येही नवीन इंटरॅक्टिव्ह सुविधा जोडण्यात आली आहे. डायग्नोस्टिक क्विझच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणत्या विषयांवर त्यांची पकड चांगली आहे आणि कोणत्या भागात अधिक अभ्यासाची गरज आहे, हे ओळखता येईल.
गुगल सर्च आणि गुगल लेन्समध्येही AI ची मदत
गुगल सर्चमध्ये विद्यार्थ्यांसाठी नवीन AI स्टडी टूल्स उपलब्ध करून देण्यात आली आहेत. अवघड संकल्पना समजून घेण्यासाठी इंटरॅक्टिव्ह व्हिज्युअल तयार करणे, प्रोजेक्ट्स व्यवस्थित करणे, आवश्यक फाइल्स तयार करणे आणि प्रॅक्टिस क्विझ घेणे आता अधिक सोपे होणार आहे. गुगल लेन्सच्या मदतीने पुस्तकातील किंवा नोट्समधील एखादी संकल्पना समजून घेण्यासही विद्यार्थ्यांना मदत मिळेल.
शिक्षकांसाठी गुगल क्लासरुममध्ये नवी AI सुविधा
विद्यार्थ्यांसोबतच शिक्षकांसाठीही गुगलने नवीन AI टूल्स आणली आहेत. गुगल क्लासरुमच्या (Google Classroom) माध्यमातून प्रत्येक विद्यार्थ्याच्या गरजेनुसार अभ्यासाचे नियोजन करता येईल. तसेच विद्यार्थ्यांची प्रगती रिअल टाइममध्ये ट्रॅक करून त्यानुसार शिकवण्याची पद्धत बदलता येणार आहे.
एकंदरीत, गुगलच्या या नव्या AI सुविधांमुळे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना वैयक्तिक अभ्यास, सराव आणि विषय समजून घेण्यासाठी एकाच प्लॅटफॉर्मवर अनेक साधने उपलब्ध होणार आहेत.

