Homeकोल्हापूरनाव बदलून वावरणाऱ्या संचालकाला अटक ९९ लाखांची फसवणूक; कसबा बावड्यातील डॉक्टरांना गंडा

नाव बदलून वावरणाऱ्या संचालकाला अटक ९९ लाखांची फसवणूक; कसबा बावड्यातील डॉक्टरांना गंडा

लाईफमार्क रिअल इस्टेट अँड डेव्हलपर्स कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली कसबा बावड्यातील डॉक्टरांसह चौघांची फसवणूक करणाऱ्या कंपनी संचालक व एजंटाला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली.

 

वैभव वामन जोशी ऊर्फ वैभव वामन पाटील (वय ३२, रा. शांतिनगर, पाचगाव) व रूपेश दत्ता गायकवाड (३५, रा. माळवाडी, पाचगाव) अशी त्यांची नावे आहेत.

 

कंपनीचा मुख्य संचालक जोशी आडनाव बदलून वैभव पाटील नावाने एका मोटारीच्या शोरूमध्ये नोकरीलाही लागला होता. अधिक माहिती अशी, लाईफमार्क रिअल इस्टेट कंपनीचा मुख्य संचालक असलेला वैभव जोशी हा गुंतवणुकीवर १० टक्के परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणूक करून घेत होता.

 

कसबा बावडा येथील डॉ. मनोज गायकवाड यांची भेट घेऊन त्यांच्याकडून रक्कम गुंतवून घेतली होती. गायकवाड यांचे ४१ लाख रुपये, पत्नीच्या नावे १६ लाख रुपये, चुलत भाऊ प्रथमेश व प्रतीक गायकवाड यांचे २३ लाख रुपये, तर मित्र श्रीपाद साळोखे यांचे १९ लाख ४७ हजार रुपये, असे एकूण ९८ लाख ९६ हजार रुपये गुंतवून घेतले होते. सुरुवातीचे काही महिने परतावा दिल्यानंतर वैभव जोशी अचानक गायब झाला.

 

घर विकून जोशी पसार… वैभव जोशीने पाचगाव येथील स्वतःचे राहते घर विकले होते. काही महिन्यांपासून तो खोली भाड्याने घेऊन पाचगाव परिसरात राहत होता. याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली. त्यांनी उपनिरीक्षक जालंदर जाधव, अंमलदार युवराज पाटील, शुभम संकपाळ यांना पाठवून संशयित वैभव जोशी व एजंट रूपेश गायकवाड याला अटक केली.

 

सहा संशयितांवर गुन्हा फसवणूकप्रकरणी डॉ. गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैभव जोशीसह त्याची पत्नी स्वाती जोशी, आई वंदना जोशी, संचालक तेजस शामराव जोशी, आकाश शरद एकल आणि रूपेश गायकवाड, अशा सहा जणांवर २१ जुलै २०२५ ला शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यानंतर वैभव जोशीसह संचालक पसार झाले होते.

 

मोटार शोरूममध्ये नोकरी… फसवणुकीच्या गुन्ह्यात पसार झालेल्या वैभव जोशीने स्वतःचे नाव वैभव पाटील, असे करून घेतले होते. याच नावाने तो सध्या वावरत होता. उद्यमनगरातील एका मोटारीच्या शोरूममध्ये तो नोकरी करत होता. येथेही त्याला वैभव पाटील नावानेच सर्व जण ओळखत असल्याचे तपासात समोर आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -