देशासह महाराष्ट्रात गणेशोत्सवाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने राज्यातील विविध शहरांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
पुणे आणि मुंबईसह राज्याच्या कानाकोपऱ्यात गणरायाच्या आगमनाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. दरम्यान, मुंबईतील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी झाली आहे.
लालबागच्या राजाला ‘नवसाला पावणारा गणपती’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दरवर्षी देशभरातून लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी मुंबईत दाखल होतात. यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी कालपासूनच भाविकांनी मोठी रांग लावली असून, पहाटेपासून गर्दीत सातत्याने वाढ होत आहे. दर्शनासाठी भाविकांची रांग तब्बल ५ ते ६ किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे चित्र आहे.
‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे. बाप्पाच्या मुखदर्शनासाठी भाविक मोठ्या उत्साहाने रांगेत उभे आहेत. गर्दी मोठ्या प्रमाणात असल्याने दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांच्या सोयीसाठी विविध व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
देशभरातून भाविक मुंबईत दाखल
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर देशाच्या विविध भागांतून भाविक मुंबईत येतात. गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, कोलकाता यांसह अनेक राज्यांमधून मोठ्या संख्येने भाविक बाप्पाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले आहेत.
काही भाविक नवस करण्यासाठी तर काही जण केलेला नवस फेडण्यासाठी लालबागच्या राजाच्या दरबारात येतात. दरवर्षी बाप्पाच्या चरणी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, तसेच सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले जातात. यंदाही लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे.
देखावा ठरतोय भाविकांचे आकर्षण
यंदा लालबागच्या राजाचे ९३ वे वर्ष असून, शिव शंकर या थीमवर आधारित देखावा मंडळाच्या वतीने साकारण्यात आला आहे. हाच देखावा भाविकांचे मुख्य आकर्षण ठरत आहे.
लालबागच्या राजासह इतर गणेश मंडळांचेही दर्शन
लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविक मुंबईतील इतर प्रसिद्ध गणेश मंडळांनाही भेट देतात. मुंबईतील गणेशोत्सवात लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या तीन प्रमुख गणेश मंडळांना विशेष महत्त्व आहे.
त्यामुळे या परिसरात गणेशोत्सवाच्या काळात मोठी गर्दी पाहायला मिळते. भक्ती, उत्साह आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह ओसंडून वाहत आहे.
