गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यासह सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी महायुतीकडून उमेदवारांची आज, गुरुवारी घोषणा करण्यात आली. २५ उमेदवारांच्या नावाची यादी मंत्री हसन मुश्रीफ यांनी जाहीर केली. गतवेळच्या १४ संचालकांना पुन्हा संधी तर ३ संचालकांचा पत्ता कट करून इतरांना संधी देण्यात आली आहे.
‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपावरुन काल, बुधवारी रात्री उशिरापर्यंत घोळ सुरु होता. अनुसूचित जाती/जमाती, इतर मागास प्रवर्ग व एक महिला गटातील जागेवरुन पेच निर्माण झाला होता. मात्र, आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी जागावाटपाचा गोंधळ संपला. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज, २५ उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली.
यादीत अनेक विद्यमान तसेच इच्छुकांना संधी न मिळाल्याने नाराजीचे वातावरण निर्माण झाले. पी. एन. पाटील गटाला केवळ एक जागा मिळाल्याने गटात मोठी अस्वस्थता आहे. महायुतीकडून संधी न मिळालेल्या इच्छुकांनी काँग्रेस नेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसप्रणित समविचारी आघाडीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीत नाराजी वाढण्याची शक्यता आहे.
किसन चौगले यांचा समविचारी आघाडीत प्रवेश
महायुतीमध्ये गोकुळचे माजी संचालक किसन चौगले यांच्या उमेदवारीचा पत्ता कट होताच त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी राजर्षी शाहू समविचारी आघाडीत प्रवेश केला. चौगले यांचा प्रवेश होताच सतेज पाटील यांनी त्यांची उमेदवारीही जाहीर केली.
महायुतीच्या यादीतील उमेदवार
सर्वसाधारण गट
१. राजेश नृसिंहराव पाटील – चंदगड, २. विश्वास नारायण पाटील-आबाजी – करवीर, ३. अरुण गणपतराव डोंगळे – राधानगरी, ४. राहुल पांडुरंग ऊर्फ पी. एन. पाटील – करवीर, ५. अजित यशवंत नरके – पन्हाळा, ६. संभाजी रंगराव पाटील – करवीर, ७. अजित पांडुरंग पाटील – करवीर, ८. विरेंद्र संजय मंडलिक – कागल, ९. कर्णसिंह संजयसिंह गायकवाड – शाहूवाडी, १०. अमरसिंह यशवंत पाटील – पन्हाळा, ११. युवराज दत्ताजीराव पाटील – कागल, १२. मदन बाबुराव देसाई – भुदरगड, १३. अंबरीषसिंह संजय घाटगे – कागल, १४. चेतन अरुण नरके – पन्हाळा, १५. अशोक काशिनाथ चराटी – आजरा, १६. रणजीत कृष्णराव ऊर्फ के. पी. पाटील – भुदरगड, १७. सतीश भिमगोंडा पाटील – गडहिंग्लज, १८. रणजीत दिलीप पाटील – शिरोळ
१९. दिपक भरमू पाटील – चंदगड, २०. प्रतापसिंह शंकरराव पाटील – करवीर
अनुसूचित जाती-जमाती : डॉ. सुजित वसंतराव मिणचेकर – हातकणंगले
विमुक्त जाती/भटक्या जमाती/विशेष मागास प्रवर्ग : विश्वास शंकर जाधव – पन्हाळा
इतर मागासवर्गीय : नावीद हसनसाहेब मुश्रीफ – कागल
महिला राखीव : शौमिका अमल महाडिक – करवीर
सौ. अर्चना आनंदसाव ऊर्फ ए. वाय. पाटील – राधानगरी
