आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये निवडणूक आयोगाकडून राबवण्यात आलेल्या मतदार याद्यांच्या एसआयआर प्रक्रियेनंतर मतदारांच्या संख्येत मोठी घट नोंदवण्यात आली आहे.
या प्रक्रियेनंतर पाचही राज्यांच्या मतदार याद्यांमधून तब्बल २.२९ कोटी मतदार कमी झाले असून, यामध्ये एकट्या उत्तर प्रदेशातील २.०४ कोटी मतदारांचा समावेश आहे.
निवडणूक आयोग आणि राज्यांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, या पाच राज्यांमध्ये पुनर्विचार प्रक्रियेपूर्वी एकूण १८.७१ कोटी मतदार होते. मात्र पडताळणीनंतर अंतिम मतदार यादीत ही संख्या १६.४३ कोटींवर आली आहे. म्हणजेच एकूण मतदारांच्या संख्येत जवळपास १२.२ टक्क्यांची (२.२९ कोटी) घट झाली आहे. या एकूण घसरणीपैकी तब्बल ९० टक्के घट ही केवळ उत्तर प्रदेशात झाली आहे. उत्तर प्रदेशात यापूर्वी १५.४४ कोटी मतदार होते, पण यादी अद्ययावत केल्यानंतर आता १३.४० कोटी मतदार शिल्लक राहिले आहेत. यामुळे राज्याच्या मतदार संख्येत १३.२४ टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
इतर राज्यांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, पंजाबमध्ये पूर्वीच्या २.१५ कोटी मतदारांमधून सुमारे १४ लाख (६.३४ टक्के) मतदार कमी होऊन अंतिम संख्या २.०१ कोटींवर आली आहे. उत्तराखंडमध्ये ८० लाख मतदारांमधून ८ लाख (१०.०७ टक्के) मतदार घटले असून आता तिथे ७२ लाख मतदार आहेत. ईशान्येकडील मणिपूर राज्यात २०.९ लाख मतदारांपैकी १.३ लाख (६.३३ टक्के) मतदार कमी होऊन अंतिम यादीत १९.६ लाख मतदारांची नोंद झाली आहे. गोव्यातही १.३ लाख (१०.७६ टक्के) मतदारांची कमी झाली असून तेथील मतदार संख्या ११.८५ लाखांवरून १०.५८ लाखांवर आली आहे. विशेष म्हणजे,गोव्याच्या अंतिम यादीत वगळण्यात आलेल्या मतदारांपैकी एकही नाव पुन्हा जोडले गेले नाही.
पुढील वर्षी म्हणजेच २०२७ च्या सुरुवातीला या पाचही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजणार आहे. उत्तर प्रदेश विधानसभेचा कार्यकाळ २२ मे २०२७ रोजी, तर मणिपूर, गोवा, पंजाब आणि उत्तराखंड विधानसभेचा कार्यकाळ मार्च २०२७ मध्ये संपुष्टात येत आहे.
