Homeमहाराष्ट्रहिंगोली जिल्हा व सत्र न्यायालय बॉम्बने उडविण्याची धमकी; परिसरात खळबळ

हिंगोली जिल्हा व सत्र न्यायालय बॉम्बने उडविण्याची धमकी; परिसरात खळबळ

हिंगोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा ई-मेल सोमवारी सकाळी न्यायालयाच्या पोर्टलवर प्राप्त झाला. या प्रकारामुळे न्यायालय परिसरात एकच खळबळ उडाली. ई-मेलची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. बीडीडीएस पथकासह विविध पोलिस पथकांनी न्यायालयाच्या इमारतीत शोधमोहीम सुरू केली.

 

सोमवारी सकाळी न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू असताना सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास न्यायालयाच्या पोर्टलवर हा धमकीचा ई-मेल प्राप्त झाला. त्यामध्ये न्यायालयाची इमारत बॉम्बने उडवून देण्याचा इशारा देण्यात आला होता. ही बाब निदर्शनास येताच न्यायालय प्रशासनाने तत्काळ पोलिस विभागाला माहिती दिली.

 

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक मोहन भोसले, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सायबर सेलचे सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत आरसेवार यांच्यासह बीडीडीएसचे उपनिरीक्षक नागरे, सचिन गोरले, अभिजित हलगे आणि शहर पोलिस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. याशिवाय दहशतवादविरोधी पथकानेही न्यायालय परिसरात धाव घेतली.

 

बीडीडीएस पथकाने न्यायालयाच्या चार मजली इमारतीतील प्रत्येक मजल्याची कसून तपासणी सुरू केली. संशयास्पद वस्तूंचा शोध घेण्यासाठी संपूर्ण परिसराची पाहणी करण्यात आली. दुसरीकडे, सायबर सेलच्या पथकाने धमकीचा ई-मेल नेमका कोठून आणि कोणी पाठविला, याचा तांत्रिक तपास सुरू केला आहे.

 

या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी न्यायालय परिसरात ठाण मांडले होते. सुमारे तीन तासांपासून शोधमोहीम सुरू असल्याने न्यायालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

 

याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांनी न्यायालयाला धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. ई-मेल पाठविणाऱ्याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलमार्फत तपास सुरू असून न्यायालयाच्या इमारतीची तपासणीही करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -