ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरसमोर अचानक दुचाकी आल्याने चालकाने ट्रॅक्टरला जोरात ब्रेक लावला. त्यामुळे मागील उसाने भरलेली ट्रॉली विरुद्ध दिशेला जाऊन दुसऱ्या दुचाकीवर पलटी (Karad Road Accident) झाली.
या भीषण अपघातात दुचाकीवरील आईचा मृत्यू झाला, तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी (ता. ५) सकाळी दहाच्या सुमारास मलकापूरमधील आगाशिवनगर येथील कोणार्क पार्कसमोर घडली. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक सुमारे एक तास विस्कळित झाली होती.
मालन मोहन सुतार (वय ६०) असे मृत महिलेचे नाव असून, यशवंत मोहन सुतार (वय २८, दोघेही रा. काढणे, ता. पाटण) असे गंभीर जखमी मुलाचे नाव आहे. यशवंत यांच्यावर कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, चचेगाव (ता. कराड) येथून ऊसतोड करून ट्रॅक्टर दोन ट्रॉलींसह कृष्णा सहकारी साखर कारखान्याकडे निघाला होता. आगाशिवनगर येथील कोणार्क पार्क अपार्टमेंटसमोर ट्रॅक्टर आला असता, अपार्टमेंटमधून अचानक एक दुचाकीस्वार रस्त्यावर आडवा आला. त्याला वाचवण्यासाठी ट्रॅक्टरचालकाने तत्काळ ब्रेक लावला. यामुळे ट्रॅक्टरच्या मागील उसाने भरलेली ट्रॉली विरुद्ध दिशेला जाऊन पलटी झाली.
दरम्यान, मालन सुतार आणि त्यांचा मुलगा यशवंत हे कराडमधील काम आटोपून दुचाकीवरून आपल्या काढणे गावी निघाले होते. त्याचवेळी पलटी झालेली उसाची ट्रॉली त्यांच्या दुचाकीवर कोसळली. त्यामुळे मायलेक दोघेही ट्रॉलीखाली अडकले. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी धाव घेत त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. दोघांनाही तातडीने कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच मालन सुतार यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.
बचावकार्यात बघ्यांच्या गर्दीचा अडथळा
अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. ढेबेवाडीहून कराडकडे जाणारी आणि कराडहून ढेबेवाडीकडे येणारी वाहतूक सुमारे एक तास ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना जवळपास दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघातस्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केल्याने बचावकार्यात अडथळे निर्माण झाले. गर्दी हटवण्यासाठी पोलिसांना पलटी झालेल्या ट्रॉलीतील ऊस हातात घेऊन नागरिकांना बाजूला करण्याचे प्रयत्न करावे लागले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय दराडे, महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज बाबर, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मलकापूरचे नगराध्यक्ष, पदाधिकारी, नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनीही मदतकार्यात सहभाग घेतला. सुमारे तासभराच्या प्रयत्नांनंतर क्रेनच्या साह्याने पलटी झालेली ट्रॉली बाजूला करण्यात आली. तसेच रस्त्यावरील ऊस हटवून वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
अनियंत्रित पार्किंग, जाहिरात फलकांमुळे अपघातांचा धोका
या मार्गावर मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच दुभाजकातील वाढलेली झाडे आणि जाहिरातींसाठी लावण्यात आलेले फलक यामुळे वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या बाबी अपघातांना कारणीभूत ठरत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. त्यामुळे दुभाजकातील झाडांची छाटणी करावी, अनावश्यक जाहिरात फलक हटवावेत आणि रस्त्यावरील अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
फटाक्यांचे स्टॉलही अपघातांना निमंत्रण?
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नगरपालिकेने आगाशिवनगर परिसरात दोन ठिकाणी फटाके विक्रीच्या स्टॉलसाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, कोणार्क पार्कच्या प्रवेशद्वाराशेजारी उभारण्यात आलेले फटाक्यांचे स्टॉल थेट रस्त्याला लागून आहेत. या स्टॉलवर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना रस्त्यावरच वाहने उभी करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीसह मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण होऊ शकतो. फटाक्यांचे स्टॉल रस्त्यालगत न उभारता पाठीमागील मोकळ्या जागेत हलवावेत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
