Homeमहाराष्ट्रबँकेची कामे अडकणार, अडीच लाख कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; बँका कधी बंद असणार,...

बँकेची कामे अडकणार, अडीच लाख कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; बँका कधी बंद असणार, आताच तारखा नोट करून ठेवा

पुढील महिन्यात म्हणजेच डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात बँकेत जाऊन एखादे महत्त्वाचे काम पूर्ण करायचे असेल तर तुमच्या नियोजनाचा पुन्हा एकदा विचार करा. कारण पुढील महिन्याच्या सुरुवातीलाच देशातील जवळपास 2.5 लाख बँक कर्मचारी केंद्र सरकारच्या एका निर्णयाविरोधात संपावर जाणार आहेत.

 

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA), ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन (AIBOA) आणि बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) या तीन संघटनांनी 3 डिसेंबर रोजी बँक संपाची घोषणा केली आहे.

 

बँक कर्मचाऱ्यांच्या संपामागचे कारण म्हणजे सरकारने आयडीबीआय (IDBI) बँकेतील एकूण 60.72 टक्के हिस्सा कॅनडाच्या फेअरफॅक्स (Fairfax) ग्रुपला विकण्याचा घेतलेला निर्णय. आर्थिक व्यवहारविषयक मंत्रिमंडळ समितीने गेल्या 14 ऑक्टोबर रोजी या विक्रीला मंजुरी दिली होती. बँक कर्मचारी संघटनांचे म्हणणे आहे की, एखाद्या भारतीय बँकेचे नियंत्रण परदेशी खासगी कंपनीकडे सोपवणे हे बँकेत पैसे जमा करणाऱ्या ग्राहकांसाठी योग्य नाही. तसेच देशाच्या बँकिंग व्यवस्थेच्याही हिताचे नाही.

 

सरकार आणि एलआयसी विकणार हिस्सा

 

या प्रस्तावित व्यवहारांतर्गत केंद्र सरकार आयडीबीआय बँकेतील आपला 30.48 टक्के हिस्सा, तर एलआयसी आपला 30.24 टक्के हिस्सा विकत आहे. फेअरफॅक्सने यासाठी प्रति शेअर 81 रुपयांची बोली लावली आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या हिस्स्याची किंमत सुमारे 26,620 कोटी रुपये तर एलआयसीच्या हिस्स्याची किंमत जवळपास 26,440 कोटी रुपये निश्चित करण्यात आली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आवश्यक मंजुरी मिळाल्यानंतर हा व्यवहार चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

 

संघटनांची मागणी; खासगीकरण थांबवा

 

संपाची घोषणा करणाऱ्या तिन्ही कर्मचारी संघटनांनी सरकारकडे आयडीबीआय बँकेच्या विक्रीचा निर्णय तातडीने मागे घेण्याची आणि सरकारी बँकांचे खासगीकरण थांबवण्याची मागणी केली आहे. संघटनांच्या म्हणण्यांनुसार आयडीबीआय बँकेत सर्वसामान्य नागरिकांच्या कष्टाचे जवळपास 3.5 लाख कोटी रुपये जमा आहेत. तसेच बँकेने 2.5 लाख कोटी रुपयांचे कर्जही दिले आहे. अशा परिस्थितीत बँकेचे नियंत्रण खासगी कंपन्यांच्या हातात दिल्यास ग्राहकांच्या ठेवींमधील पैशांच्या सुरक्षिततेबाबत चिंता निर्माण होऊ शकते.

 

याशिवाय लोकांची बचत खासगी कंपन्यांच्या भरोशावर राहू नये यासाठी खासगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्याची मागणीही कर्मचारी संघटनांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -