कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (कोल्हापूर जिल्हा बँक) संचालक मंडळाच्या निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने 21 पैकी 18 जागा मिळविल्या असल्या, तरी आघाडीतील संशयकल्लोळ थांबण्याचे नाव घेत नाही. यामुळेच निवडून आलेल्या संचालकांची बैठकच झालेली नाही. प्रत्येकाचा आपला आपला हिशेब मांडण्याची तयारी झाली आहे. ही चर्चा टाळण्यासाठी सत्ताधारी आघाडीची बैठक अध्यक्षपदाच्या निवडीच्या तोंडावर होण्याची शक्यता आहे.
बाबासाहेब आसुर्लेकर यांच्या उमेदवारीवरून झालेल्या संघर्षानंतर शिवसेनेने खा. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली आपले पॅनेल उभे केले. यातूनच आघाडीतील मतभेदांची कुजबूज सुरू झाली. निवडणुकीत नको होते ते आसुर्लेकर विजयी झाले आणि हवे असलेले आवाडे पराभूत झाले. त्यामुळे विनय कोरे यांनी आपल्या संतापाला मोकळी वाट करून दिली. त्या पाठोपाठ प्रकाश आवाडे यांनीही आपला संताप व्यक्त केला.
निवडीनंतर आघाडीचे नेते म्हणून हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषद घेतली आणि आमचे निवडून आलेले 18 संचालक व पराभूत तीन उमेदवार अशा 21 जणांची बैठक होईल आणि पुढील धोरण ठरविले जाईल, असे जाहीर केले; मात्र विनय कोरे यांनी त्यापूर्वीच आघाडीअंतर्गत असंतोषाला वाट करून
दिली.
सर्वसमावेशक राजकारण करण्याच्या प्रयत्नाला जिल्ह्यातील नेत्यांनी सुरुंग लावला. सत्ताधारी आघाडीतील नेते प्रामाणिक राहिले असते, तर आघाडीची एकही जागा गेली नसती. हे पाप ज्यांच्या हातून घडले असेल, त्यांना योग्य वेळी किंमत मोजावी लागेल, असे सांगून विनय कोरे यांनी विजयानंतरच्या संघर्षाला आघाडीअंतर्गत वादाची बत्ती दिली.
गुरुवार, दि. 20 रोजी जिल्हा बँक अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आघाडीची बैठक अद्याप झालेली नाही. ही बैठक आघाडीअंतर्गत संशयकल्लोळामुळे टाळली जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. आघाडीचे नेते हसन मुश्रीफ यांनी मात्र ही बैठक पालकमंत्री सतेज पाटील कोल्हापुरात आल्यानंतर घेतली जाईल, असे सांगत वेळ मारून नेली आहे.
ही बैठक टाळण्यामागे आघाडीतील संशयकल्लोळ, विनय कोरे आणि प्रकाश आवाडे यांच्याकडून मांडला जाणारा नेत्यांच्या भूमिकेचा हिशेब ही कारणे असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ऐन निवडीच्या तोंडावर दि. 19 किंवा 20 रोजी ही बैठक होण्याची शक्यता आहे.
कोल्हापूर जिल्हा बँक : निकालानंतरही सत्ताधारी आघाडीत संशयकल्लोळ
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -