राज्यावर कोरोनाचे संकट असून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे सरकारने लसीकरण मोहीमेवर भर दिला आहे. अशामध्ये सरकारने सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर आता राज्यातील शाळांमध्येही लहान मुलांची लसीकरण मोहिम राबण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्याच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले. तसेच मुलांच्या लसीकरणाबाबत संभ्रम बाळगण्याचे कोणतेही कारण नाही, असे देखील राजेश टोपे यांनी सांगितले.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. लसीकरणावर जोर दिला गेला पाहिजे यावर बैठकीत भर देण्यात आला. आजही लसीचा पहिला डोज आणि दुसरा डोज यामध्ये राज्यातील काही जिल्हे मागे पडले आहेत. त्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांसह आयुक्तांनी विशेष लक्ष द्यावे अशी चर्चा बैठकीत झाली.’
24 जानेवारीपासून राज्यातील सर्व शाळा पुन्ह सुरू केल्या जाणार आहेत. जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी पालकमंत्री , मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्या सल्ल्याने कोणत्या तालुक्यातील आणि कोणत्या शाळा सुरू करायच्या हा निर्णय त्यांनी द्यावा. पण बऱ्यापैकी शाळा सुरू कराव्यात असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. तसंच, 15 ते 18 वयोगट म्हणजे नववी, दहावी आणि अकरावीच्या वर्गातील मुलांचे शाळेत लसीकरण करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. मुलांचं शाळेत लसीकरण करताना संपूर्ण काळजी घेतली जावी अशी चर्चाही बैठकीत झाली असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.