सत्ताप्रकार ‘इ’ मधील जाचक अटीतून सांगली शहरातील शेकडो मालमत्ता वगळण्यास महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी मान्यता दिली आहे. यासाठी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पाठपुरावा केला. या निर्णयाचा शहरातील 35 हजार व्यापारी आणि नागरिकांना लाभ होणार आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
याबाबत पृथ्वीराज पाटील म्हणाले, वखारभाग, टिंबर एरिया, ओव्हरसियर कॉलनी, दक्षिण शिवाजीनगर, कॉलेज कॉर्नर, रतनशीनगर, गावभाग येथील या मिळकती आहेत. नगरभूमापन विभागाच्या निर्णयामुळे व्यापारी व नागरिकांना आपल्या मिळकती हस्तांतरित करता येत नव्हत्या. त्यांची खरेदी-विक्री, वाटणीपत्र, बक्षीसपत्र, बँक गहाणखत यापैकी काहीही करता येत नव्हते. या मिळकती मुक्त होण्यासाठीचा प्रस्ताव मी ना. थोरात यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन दिला आणि त्याचा पाठपुरावा केला. त्यामुळे ना. थोरात यांनी हा आदेश दिला.