त्र्यंबकेश्वर येथे पैठण (जि. औरंगाबाद) येथून आलेल्या भाविकाचा पिकअप परतीच्या प्रवासादरम्यान, त्र्यंबकपासून अवघ्या दोन कि.मी.अंतरावर उलटले. या अपघातात अकरा जण गंभीररित्या जखमी झाले असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, यात लहान मुलींचा समावेश अधिक आहे. तसेच, 27 जणांना किरकोळ जखमा झाल्या असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्र्यंबकमधील मठात ठेवण्यात आले आहे.
येथील यावर्षीची पौषवारी रद्द झाल्याने वारकरी वाहनाने दर्शनासाठी येत आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण येथील राधाकृष्ण आश्रमात वारकरी शिक्षण घेणा-या मुली आणि त्यांच्या समवेत पालक, शेजार्यांसह एका महिंद्रा पिकअप वाहनातून 38 वारकरी बुधवारी (दि.19) त्र्यंबकेश्वर येथे आले होते. येथील मुकुंद महाराज मठात ते वास्तव्यास होते. संत निवृत्तीनाथ महाराज समाधी दर्शन, ब—ह्मगिरी प्रदक्षिणा आदी सर्व आटोपले. त्यानंतर गावी परतण्यासाठी शुक्रवारी (दि.21) जानेवारीच्या पहाटे परतीच्या प्रवासाला निघाले असता, सकाळी 6 वाजेच्या दरम्यान त्र्यंबकेश्वरपासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या वीज वितरण उपकेंद्राच्या उतारावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने पिकअप पलटी झाली. या अपघातात 11 जण गंभीर तर 27 जणांना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. गंभीर जखमींमध्ये मुलींची संख्या अधिक आहे.