भिवंडी तालुक्यातील टेंभिवली गावात विटभट्टीसाठी लागणारा दगडी कोळसा हायड्रॉलीक हायवा ट्रकमधून खाली केला जात होता. दरम्यान ट्रकच्या मागील बाजूच्या ट्रॉलीचा कॉम्प्रेसर रॉड तुटल्याने संपूर्ण मागील ट्रॉली कोळश्यासह वीटभट्टी मजुराच्या झोपडीवर पडली. यामुळे झालेल्या अपघातात आदिवासी मजुराच्या झोपडीत झोपलेल्या तीन चिमुरड्या मुलींचा कोळशाच्या ढिगाऱ्याखाली दुर्दैवी मृत्यू झाला.
या दुर्घटनेत बाळाराम कान्हा वळवी या आदिवासी वीटभट्टी मजुराच्या लावण्या (वय ७), अमिषा (वय ६), प्रीती (वय २) या तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
या अपघातामुळे झालेल्या मोठ्या आवाजाने इतर कामगार त्याठिकाणी धावून येत कोळशाच्या ढिगाऱ्याखालुन सर्वांना बाहेर काढले. परंतु तोपर्यंत या चिमुरडींचा जीव गेला होता. भिवंडी तालुक्यातील दुगाडफाटा येथील मोहिली येथील बाळाराम वळवी हा आपल्या पत्नी चार मुलींसह वीटभट्टी मजुरीसाठी टेंभिवली येथे वीटभट्टीवर मजुरीसाठी आले होते.