भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेला रविवारपासून सुरुवात होत आहे. कोरोना संर्गामुळे मालिकेतील तीनही सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. या मालिकेनंतर उभय संघांमधील टी २० मालिका कोलकाताच्या इडन गार्डन मैदानावर खेळली जाणार आहे.
दरम्यान, भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ६ धावा केल्यास तो सचिन तेंडूलकरचा मोठा विक्रम मोडीत काढेल. ३३ वर्षीय विराट भारतीय भूमीवर ५००० धावा करणारा दुसरा फलंदाज ठरणार आहे. त्याच्या आधी फक्त सचिन तेंडूलकरनेच भारतासाठी अशी कामगिरी केली आहे. तेंडूलकरने भारतीय भूमीवर १६४ सामन्यांच्या १६० डावांमध्ये ६,९७६ धावा केल्या आहेत.
सचिनने भारतीय भूमीवर १२१ डावांत ५००० धावा पूर्ण केल्या. दुसरीकडे विराट कोहलीने आतापर्यंत भारतीय भूमीवर ९८ सामने खेळले असून त्याने ९५ डावांत ४९९४ धावा केल्या आहेत. आता त्याला ५००० धावांचा टप्पा गाठण्यासाठी अवघ्या ६ धावांची गरज आहे. ९६ व्या डावात तो ही कामगिरी पार पाडेल अशी आशा क्रिकेट चाहत्यांना आहे.