Wednesday, March 11, 2026
Homeमहाराष्ट्रएसटी कर्मचाऱ्यांना ब्रेथ ॲनालायझर चाचणी सक्तीची; प्रवाशांचा प्रवास सुखकर-सुरक्षित होण्यासाठी महामंडळाचा निर्णय

एसटी कर्मचाऱ्यांना ब्रेथ ॲनालायझर चाचणी सक्तीची; प्रवाशांचा प्रवास सुखकर-सुरक्षित होण्यासाठी महामंडळाचा निर्णय

एसटी महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकर व सुरक्षित व्हावा, यासाठी महामंडळ उपाययोजना राबवत आहे. त्याचाच भाग म्हणून एसटी कर्मचाऱ्यांच्या सेवाकाळातील मद्यपानास आळा घालण्यात येत असून त्यासाठी एसटी कर्मचाऱ्यांना अल्को टेस्ट मशीन (ब्रेथ ॲनालायझर) चाचणी सक्तीची केली आहे.

 

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे आदेश दिले आहेत.

 

मंत्री सरनाईक यांनी मुंबईतील परळ बसस्थानकाला अचानक भेट दिली. तेंव्हा चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहात मद्याच्या बाटल्या आढळल्या. तसेच काही कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत आढळले होते.

 

या धक्कादायक प्रकाराची गंभीर दखल घेत मंत्री सरनाईक यांनी तातडीने चौकशी समिती नियुक्त केली. जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. असे प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी कडक उपाययोजना राबविण्याचे त्यांनी सुचित केले.

 

नव्या उपायांनुसार एसटी आगारात कामावर हजर होणाऱ्या चालकांची वाहन परीक्षकांकडून नियमित तपासणी केली जाणार आहे. तसेच वाहकांना ड्यूटी देण्यापूर्वी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे बंधनकारक केले आहे.

 

चालक व वाहकांची मद्यपान तपासणी झाली आहे की नाही, यावर सहायक कार्यशाळा अधीक्षक, सहायक वाहतूक अधीक्षक, वाहतूक निरीक्षक, सहायक वाहतूक निरीक्षक आणि वाहतूक नियंत्रक यांनी देखरेख ठेवण्याच्या सूचना आहेत.

 

बस मार्गावर असताना चालकाने नियंत्रण कक्षात लॉगबुकची नोंद करणे बंधनकारक आहे. तपासणी नियमितपणे होते की नाही, याची खात्री स्थानक प्रमुखांनी करावी, असेही आदेश आहेत.

 

याशिवाय बसस्थानक व आगार परिसरातील चालक, वाहक आणि विश्रांतीगृहांतील कर्मचाऱ्यांची वेळोवेळी अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी करून त्याची नोंद ठेवणे बंधनकारक केले आहे. संबंधित विभागातील पालक अधिकाऱ्यांनी आगार व बसस्थानक भेटीदरम्यान या उपाययोजनांची अंमलबजावणी तपासण्याच्या सूचना आहेत.

 

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत एसटी प्रशासनाने मद्यपानासंदर्भात कठोर भूमिका घेतली असून या उपाययोजनांमुळे बससेवा अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध होईल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

 

यासोबतच जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक, चालक-वाहक विश्रांतीगृहे तसेच ज्या आगारांमध्ये चालक-वाहक जास्त प्रमाणात थांबतात, अशा ठिकाणी मद्यपानास प्रतिबंध करण्यासाठी विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अतिथीगृह परिसरातील स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईट-पंखे आदी सुविधांची देखभाल करण्याची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवर

सोपवली आहे.

 

मद्यपान जनजागृती सप्ताह

 

दक्षता विभाग वेळोवेळी गोपनीय तपासणी मोहीम राबवेल. मार्ग तपासणी पथक, वाहतूक निरीक्षक, प्रशिक्षण विभाग आणि सुरक्षा विभाग यांच्या माध्यमातून तपासणी होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांत जनजागृती करण्यासाठी प्रशिक्षण सत्रे होतील. सामाजिक संस्थांच्या सहकार्याने मद्यपानाचे दुष्परिणाम याबाबत प्रबोधन केले जाणार आहे. तसेच आगारांमध्ये विशेष ‘मद्यपान जनजागृती सप्ताह’ केला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -