भाजपचे नेते आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी सकाळी जोगेश्वरी -विक्रोळी लिंक रोडवर एनएसजी कॅम्पजवळ हा अपघात झाला. या अपघातामध्ये प्रविण दरेकर सुदैवाने बचावले. पण त्यांच्या गाडीच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. या महिनाभरात प्रवीण दरेकरांच्या गाडीला तिस-यांदा अपघात झाला आहे.
प्रवीण दरेकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘या महिन्याभरात माझ्या गाडीला तिसऱ्यांदा अपघात झाला असून तिन्ही अपघात एकसारखेच आहेत. तिन्ही अपघातात बाईकवाला अचानक पुढे आल्याने अपघात झाला आहे. त्यामुळे माझ्यासह माझ्यासहका-यांना देखील संशय निर्माण झाला आहे. याप्रकरणी मी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार आहे.’ तसंच, ‘मी विरोधी पक्षनेता असल्याने मला राज्यभर फिरावे लागते. पण अशा पध्दतीने सतत अपघात होत असल्याने माझ्या मनात शंका येत आहे. तिन्ही वेळी गाडीचे मोठं नुकसान झाले आहे. 15 दिवसांपासून ही अपघाताची मालिका सुरू असून आजचा हा प्रकार तिस-यांदा झाला आहे. त्यामुळे मी चौकशी करणार आहे.’ असे देखील प्रवीण दरेकरांनी सांगितले.