रविवारच्या सुट्टीसाठी महाबळेश्वरला निघालेल्या पर्यटकांच्या चालत्या बसला आग लागून जळून खाक झाल्याची घटना घडली. वाई- महाबळेश्वर या मार्गावरील पसरणी घाटात नागेवाडी फाट्याजवळ एका खाजगी बसने पेट घेतला होता. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु प्रवाशांच्या साहित्यासह संपूर्ण बस जाळून खाक झाली, परंतु सुदैवाने शेजारील वाहन चालकांच्या सतर्कतेमुळे सर्व पर्यटक काही मिनिटांतच बसमधून उतरल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, माणगांव (गोरेगांव) येथील खाजगी कंपनी मधील कर्मचाऱ्यांची सहल सपकाळ ट्रॅव्हल्सच्या बस ( एम एच -06 एस- 9345) ने पंढरपूरला गेली होती. तेथून रविवारी सकाळी मांढरदेव मार्गे महाबळेश्वरला निघाले असता, दुपारी तीनच्या सुमारास पसरणी घाटात बस आली. त्यावेळी शेजारून जाणाऱ्या वाहन चालकाने बसमधून धूर येत असल्याचे चालकास सांगून सतर्क केले. चालक रवींद्र कोळसकर (वय- 47, रा.माणगांव) यांनी प्रसंगावधान ओळखून बस रस्त्याच्या कडेला उभी करून गाडीतील सर्व प्रवाशी खाली उतरविले. त्यामुळे मोठा अनर्थ टाळला.
या बसमध्ये लहान मुलांसह 39 प्रवाशी होते, या घटनेची माहिती मिळताच वाई व पाचगणी पोलीस ठाण्याचे अधिकारी-कर्मचारी दाखल झाले. त्यांनी घटनेची गांभीर्य ओळखून वाईपाचगणी अग्निशमन बंबाला पाचारण केले. वाई पालिकेच्या अग्निशमन बंबाने आग विझविण्याचे प्रयत्न केला. परंतु संपूर्ण बस जाळून खाक झाली. दरम्यान या घटनेमुळे वाई पाचगणी रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. बस विझविल्या नंतर पोलीसांनी वाहतूक सुरळीत केली.