ताजी बातमी ऑनलाइन टीम
युक्रेन-रशिया वादामुळे कच्च्या तेलाच्या किंमतींचा भडका उडाला आहे. आज (मंगळवार) कच्च्या तेलाच्या किंमती 99 डॉलर प्रति बॅरलच्या विक्रमी टप्प्यावर पोहोचल्या आहेत. ब्रेंट क्रूडचा भाव 99.5 डॉलर प्रति बॅरल झाला आहे. सप्टेंबर 2014 नंतर कच्च्या तेलाचा (crude oil) विक्रमी भाव ठरला आहे. रशिया-युक्रेन वाद शमण्याची चिन्हे दिसत नाही. रशियाने युक्रेनच्या विरोधात आक्रमक पवित्रा धारण केला आहे. त्यामुळे युक्रेनच्या मुद्द्यावरुन रशिया व युरोप यांच्यातील संबध ताणण्याची शक्यता वर्तविली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तणावाचा फटका कच्च्या तेलाच्या किंमतीला बसला आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, क्रूड तेलाच्या किंमती 100 डॉलर प्रति बॅरल वर पोहोचू शकतात. देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किंमतीचा (PETROL-DISEL PRICE) देखील भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कच्च्या तेलाच्या किंमती दृष्टीक्षेपात:
• आज (मंगळवारी) ब्रेंट क्रूडच्या किंमती 96.48 डॉलर प्रति बॅरल वरुन 99.5 डॉलर प्रति बॅरल • जानेवारी महिन्यात ब्रेंट क्रूड किंमत 86. 3 डॉलर प्रति बॅरल • डब्लूटीआई क्रूड किंमत 95.43 डॉलर प्रति बॅरल
भाववाढीचा भडका कशामुळं?
कच्च्या तेलाच्या भाववाढीला रशिया-युक्रेन संकटाच कारण सांगितलं जातं. रशियाच्या युक्रेनसोबतच्या संबंधामुळे युरोपियन राष्ट्र आणि अमेरिका रशियाची आर्थिक नाकेबंदी करण्याची शक्यता आहे. यामुळे तेल पुरवठ्यावर थेट परिणाम निर्माण होऊ शकतो. त्यामुळे अनेक राष्ट्रांनी प्रतिबंधात्मक मार्ग म्हणून इंधनाचे साठे करण्याचे निर्देश जारी केले आहेत.
युक्रेनबरोबर भारताचा व्यापार कसा?
भारतातील युक्रेनियन दूतावासाच्या संकेतस्थळावरील उपलब्ध आकडेवारीनुसार, 2020 मध्ये दोन्ही देशांमध्ये 2.69 अब्ज डॉलरचा व्यापार झाला होता. युक्रेनने भारताला 1.97 अब्ज डॉलरची निर्यात केली, तर भारताने युक्रेनला 721.54 दशलक्ष डॉलरची निर्यात केली. युक्रेन भारताला घरगुती खाद्यतेल व इतर सामुग्री, अणुभट्टी आणि बाष्पवहनपात्र यांची निर्यात करतो. तर भारताकडून औषधी आणि इलेक्ट्रिकल साहित्याची खरेदी करतो.
पेट्रोल-डिझेलचा भडका?
कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीचा थेट फटका पेट्रोल-डिझेलच्या किंमतीना बसण्याची दाट शक्यता आहे. देशांतर्गत तेल उत्पादक कंपन्यांवर मोठा दबाव निर्माण झाला आहे. कच्च्या तेलाच्या तुटवड्याचं संकट भेडसावण्याच्या शक्यतेमुळे तेल कंपन्या सतर्क झाल्या आहेत. सध्या भारतात पाच विधानसभा निवडणुकांच्या वारे वाहत असल्यामुळे येत्या दिवसात पेट्रोल-डिझेल सव्वाशेपार जाण्याचा अंदाज अर्थ जाणकरांनी वर्तविला आहे.