रंगपंचमी दिवशी सायंकाळी शिंगणापूर बंधार्यात बुडालेल्या शनिवार पेठ व यादवनगर येथील दोन तरुणांचे मृतदेह गुरुवारी तिसर्या दिवशी आढळले. गुरुप्रसाद गजानन झगडे (वय 30, रा. कलकुटगी गल्ली) व सुनील सुरेश शिंदे (25, रा. यादवनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचे पार्थिव पाहताच तरुणांच्या कुटुंबीयांनी आक्रोश केला.
फोटोग्राफर असलेले गुरुप्रसाद झगडे रंगपंचमी खेळल्यानंतर जेवण करून येतो, असे सांगून घराबाहेर पडले. मित्रांसमवेत ते सायंकाळी अंघोळीसाठी शिंगणापूर बंधार्यावर गेले. तेथे जेवण केल्यानंतर मित्रांना त्यांनी घरी जात असल्याचे सांगितले. मात्र, रात्री उशिरापर्यंत ते घरी आलेच नाहीत. कुटुंबीय, नातेवाईक, मित्रमंडळींनी शोधाशोध सुरू केली व पोलिसांशी संपर्क साधला.
करवीरचे पोलिस निरीक्षक संदीप कोळेकर व त्यांच्या पथकाला रात्री उशिरा बंधारा परिसरात दुचाकी, कपडे आणि मोबाईल मिळाला. त्याची माहिती पोलिसांनी झगडे कुटुंबाला दिली. बुधवारी दिवसभर शोध घेण्यात आला. गुरुवारी सकाळी तरुणाचा मृतदेह आढळून आला.यादवनगर येथील सुनील शिंदे हादेखील रंगपंचमी खेळून मित्रांसमवेत शिंगणापूर बंधार्यावर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला नाही. तेव्हा त्याचा शोधू घेण्यात आला. सुनीलचा बंधार्यात बुडून मृत्यू झाला असावा, अशी चर्चा तेथे होती. गुरुवारी दुपारी त्याचाही मृतदेह आढळून आला.