देशासह राज्यातील सध्याची राजकीय आणि सामाजिक स्थिती लक्षात घेता काही समाजकंटकाकडून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी सोशल मीडियाचा प्रामुख्याने वापर करण्यात येत आहे. सोशल मीडिया पोस्टद्वारे समाजकंटकाकडून हा प्रकार करण्यात येत असल्याचे लक्षात घेत मुंबई पोलिस ऍक्शन मोडमध्ये आली आहे. मुंबई पोलिस सक्रिय झाली असून जातीय तेढ पसरवणाऱ्यांवर करडी नजर ठेवत आहे. गेल्या चार महिन्यात मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावरील वादग्रस्त अशा तब्बल 12,800 पोस्ट हटविल्या आहे. समाजात हिंसा पसरवण्याचा हेतूने या पोस्ट टाकण्यात आल्या होता.
मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने ही कारवाई केली आहे. त्यांनी जानेवारीत 5 हजार 754, फेब्रुवारीत 4 हजार 252, मार्चमध्ये 3 हजार 958 पोस्ट सोशल मीडियावरून हटविल्या आहे. समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच जातीय सलोखा टिकून राहावा यासाठी मुंबई पोलिसांची ही विशेष शाखा कार्यरत असते. त्यानुसार महाराष्ट्र एसआयडीची टीम दररोज 30 ते 35 वादग्रस्त पोस्ट हटवत असल्याची माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली.
राजकीय वक्तव्यानंतर वाढतात वादग्रस्त पोस्ट….
महाराष्ट्र पोलिसांच्या असे निदर्शनास आले आहे की, राजकीय पक्षांकडून कोणत्याही प्रकारचे वक्तव्य येताच सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्टाची संख्या वाढू लागते. या पोस्ट समाजात तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने टाकण्यात येतात. त्यातच कोविडपासून सोशल मीडियावर लोकांची ऍक्टिव्हिटी खूप वाढली आहे. सध्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात दुरुपयोग होत असून सामाजिक वातावरण दूषित करण्यासाठी याचा वापर होत आहे.
मुंबईत सोशल मीडिया लॅब सक्रिय…
राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले आहे. राजकारण्यांकडून राजकीय तसेच धार्मिक विषयांवर सतत वादग्रस्त वक्त्यव्य येत आहे. त्यामुळे मुंबईत वातावरण बिघडत जातीय वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जातीय वाद नियंत्रणात ठेवण्यासाठी मुंबई पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून ‘सोशल मीडिया लॅब’ सुरु करण्यात आली आहे. या माध्यमातून सोशल मीडियावर नजर ठेवण्यात येत आहे. सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्यांना ही मोठी चपराक आहे. पोलिसांच्या सोशल मीडिया लॅबकडून आक्षेपार्ह पोस्टवर कारवाई करण्यात येते. लॅबच्या मध्यातून आतापर्यंत वादग्रस्त अशा 3000 पोस्ट डिलीट करण्यात आल्या आहे.