गेल्या काही दिवसांत सातत्याने होणाऱ्या इंधन दरवाढीमुळे सामान्य नागरिक हैराण झाले आहे.. त्यावरुन विरोधक नेहमीच मोदी सरकारवर टीका करताना दिसतात.. या पार्श्वभूमीवर कोरोना परिस्थितीच्या आढावा बैठकीत बुधवारी (ता. 27) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला..
मोदी सरकारने 6 महिन्यांपूर्वी इंधनावरील ‘व्हॅट’ कमी केला, नंतर भाजपशासीत राज्यांनीही त्यांच्या करात कपात केल्याने तेथे पेट्रोल-डिझेलच्या किमती बऱ्याच कमी झाल्या. मात्र, महाराष्ट्र सरकारने त्यावेळी करात कपात केलेली नव्हती. हाच मुद्दा पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित केला.. तसेच राज्य सरकारने इंधनावरील ‘व्हॅट’ कमी करावा, अशी सूचना केली.
मोदी यांच्या आवाहनानंतर राज्यातील सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झाले.. मात्र, माेदी यांच्या आवाहनानंतर आता ठाकरे सरकार पेट्रोलच्या दरात 1 रुपया कपात करण्याच्या विचारात आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज (ता. 28) बैठक होत असून, त्यात हा प्रस्ताव मांडला जाणार असल्याचे समजते..
पेट्रोल बरोबरच डिझेलचे दरही 1 रुपयांनी कमी करता येतील का, यावरही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसा प्रस्ताव या बैठकीत मांडला जाणार असल्याचे समजते. पंतप्रधान मोदी यांनी कान टोचल्यावर इंधनाचे दर कमी करण्याचा विचार राज्य सरकार करीत असल्याचे बोलले जाते.
सरकारी तिजोरीवर पडणार भार
पेट्रोल-डिझेलचे दर कमी केल्यास राज्य सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडणार आहे. पेट्रोलची किंमत एक रुपयांनी कमी केली, तरी 121 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे. तसेच पेट्रोलची किंमत दोन रुपयांनी कमी केल्यास सरकारच्या तिजोरीवर 243 कोटी रुपयांचा भार पडणार असल्याचा अंदाज अर्थ खात्याने व्यक्त केला आहे..
दरम्यान, राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. त्यात पेट्रोल व डिझेलच्या दराबाबत ठाकरे सरकार काय निर्णय घेते, याकडे महाराष्ट्रातील नागरिकांचे लक्ष लागले आहे..