ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनामुळे राज्यात 90 ते 92 टक्के मशिदींमध्ये बुधवारी पहाटे भोंगा न लावताच अजान झाली. याबद्दल संबंधित मौलवींचे आभार मानतानाच प्रश्न आवाज कमी-जास्त करण्याचा नाही, जोपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत मनसेचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी दिला.
उत्स्फूर्तपणे सकाळच्या अजानसाठी भोंगा न वापरल्याबद्दल त्या-त्या मशिदींतील इमाम, मौलवींचा मी आभारी आहे, असे राज ठाकरे यांनी ‘शिवतीर्थ’ येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
राज्यभरात मनसेचे मशिदींवरील भोेंग्यांविरुद्ध आंदोलन सुरू झाले असून भोंग्यांवर अजान वाजेल तिथे हनुमान चालिसा लावला जात आहे. यातून संघर्ष उद्भवू नये म्हणून पोलिसांनी मुंबईसह अनेक शहरांत मनसे पदाधिकार्यांची धरपकड सुरू केली. या पार्श्वभूमीवर आपल्या शिवतीर्थ निवासस्थानी पत्रकार परिषद घेत राज ठाकरे यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली. भोंगे लावू नका इतकेच आम्ही सांगितले. लोकांनी ते मान्य केले आणि मौलवींनाही विषय समजला. सरकारपर्यंतदेखील हा विषय पोहोचला. त्याबद्दल पोलीस दलाला धन्यवाद देत राज म्हणाले, मुंबईतील 1140 पैकी 135 मशिदींमध्ये बुधवारी पहाटे भोंगा लावून अजान देण्यात आली. या सर्व मशिदींवर कारवाई करणार का? हा विषय धार्मिक नाही. सामाजिक आहे. केवळ मशिदींवरच्या भोंग्यांचा प्रश्न नाही. मंदिरांवरील भोंग्यांचाही त्रास होत असेल
तर तो बंद व्हायला हवा. दिवसभर भोंग्यावरून जी अजान दिली जाते, बांग दिली जाते ती थांबली पाहिजे.
मुंबईतील बहुतांश मशिदी अनधिकृत आहेत. त्या अनधिकृत मशिदींवर भोंग्यांना अधिकृत परवानगी कशी देता, असा सवाल करीत राज म्हणाले, मशिदींना वर्षभरासाठी भोंग्यांची परवानगी मिळतेच कशी? आम्हाला परवानगी देताना दिवसाची देता. सणासुदीला 10-12 दिवसांची देता. मग यांना 365 दिवस परवानगी कशी?
बुधवारी सकाळपासून महाराष्ट्रातून फोन येत होते. अजान झाली नसल्याचे कळवले जात होते. कुठेही राडा झाला नसताना पोलीस मनसैनिकांना नोटीसा पाठवत आहेत. मनसैनिकांना ताब्यात घेतले जातेय. हे आमच्या बाबतीतच का घडते? जे कायदा पाळत नाहीत, नियमभंग करून भोंगे लावत अजान देतात त्यांना मोकळीक दिली जात आहे. पण आमचे आंदोलन एक दिवसापुरते नाही. जोपर्यंत भोेंगे उतरवले जात नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील. ज्या ज्या मशिदींतील मौलवी ऐकणार नाहीत तिकडे आमचे कार्यकर्ते जातील. लाऊडस्पीकर लावतील आणि दुप्पट आवाजात हनुमान चालिसा वाजवणार म्हणजे वाजवणार, असा इशाराही राज यांनी दिला.