वाढत्या उष्म्यामुळे कोल्हापूरकर अक्षरश: हैराण झाले आहेत. गेल्या आठवडाभरापासून सातत्याने वाढणार्याष तापमानाने रविवारी उच्चांक गाठला. कमाल तापमान तब्बल 41 अंशांकडे पोहोचल्याने (40.3) दिवसभर नागरिकांची लाही लाही झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अहवालानुसार, 2019 नंतरचे मे महिन्यातील हे सर्वाधिक उच्चांकी तापमान आहे.
एप्रिल महिन्यापासून अधूनमधून वळवाचा पाऊस झालेला असला, तरी गेल्या आठवडाभरात कोल्हापूरच्या तापमानात झपाट्याने वाढ झाली आहे. रविवारी कमाल तापमानात 4 अंशांची वाढ होऊन पारा 40.3 अंशावर; तर आर्द्रता 54 नोंदविली गेली. उन्हाचा तीव— तडाखा, त्यात आर्द्रतेची भर पडल्यामुळे शहरवासीय घामाघूम झाले होते. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रासह देशभरात पुढील चार दिवस उष्णतेच्या तीव— लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या उष्णतेच्या लाटेचा फटका कोल्हापूरलाही बसत आहे. अननस, मोसंबी, कलिंगड, कोकम सरबत, लिंबू पाणी, उसाचा रस, आईस्क्रिम, ज्यूससह विविध शीतपेयांची विक्री शहरासह जिल्ह्यात वाढली आहे. दुपारच्या वेळेत शरीरातून घामाच्या धारा निघत असल्याने नागरिकांना एसी आणि फॅनचा आधार घ्यावा लागत आहे. दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे टाळले जात आहे. येत्या आठवड्यात ढगाळ वातावरणासह तापमान 38 ते 39 अंशांपर्यंत राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
2019 नंतर प्रथमच मे महिन्यातील कोल्हापूरचे तापमान 40 अंशांच्या पुढे गेले आहे. याआधी 20 मे 2019 रोजी पारा 41.2 अशांपर्यंत गेला होता.
• असे होते रविवारचे तापमान
कमाल तापमान : 40.3
किमान तापमान : 25.2
तापमानात झालेली वाढ : 4 अंश
सापेक्ष आर्द्रता सकाळी : 69 टक्के
सापेक्ष आर्द्रता सायंकाळी : 54 टक्के