कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले-कुंभोज मार्गावर भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मी मंदिराजवळ रस्त्यालगत उभारलेल्या एका लॉजच्या फलकाला दुचाकीची धडक बसल्याने हा अपघात घडला.
सौरभ अजित गाझी, वय अंदाजे २५, रा. दूधगाव, ता. मिरज, जि. सांगली असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघाताची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात करण्यात आली असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
सौरभ गाझी हा गेली काही वर्षे कराड येथे मामाकडे राहत होता. काल तो गावाकडे आला होता. हातकणंगलेहून दूधगावकडे दुचाकीवरून जात असताना लक्ष्मी मंदिराजवळ रस्त्यालगत लावलेल्या एका लॉजच्या फलकाला त्याची दुचाकी धडकली. धडकेनंतर दुचाकी घसरत जाऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला जाऊन आदळली. या अपघातात सौरभ गंभीर जखमी झाला. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदत करत त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला.







