विटा शहरातील गांधी चौकामध्ये एका इमारतीत मूळव्याधावर बोगस वैद्यकीय उपचार करणार्याय डॉ. एस. के. विश्वास याच्यावर विटा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. याबाबत मनसेच्या माहिती अधिकारी कार्यकर्ता महासंघाच्या पाठपुराव्यानंतर तालुका आरोग्य अधिकारी अनिल विठ्ठल लोखंडे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गांधी चौकातील कराड रस्त्यालगतच्या एका इमारतीमध्ये चांदसी क्लिनिकमध्ये मूळव्याध आणि भगेंद्र या रोगांवर अनेक दिवसांपासून उपचार केले जातात. तेथील डॉक्टर एस. के. विश्वास हा रुग्णांवर अघोरी पद्धतीने उपचार करतो, अशी माहिती मिळाली होती. त्यानंतर तालुकाध्यक्ष साजिद आगा आणि प्रशांत कदम यांनी याचा पाठपुरावा सुरू केला.
त्यांनी या दवाखान्यातील डॉक्टर विश्वास याच्या वैद्यकीय पदवीची माहिती घेतली. तो बी. ई. एम. एस. (एम.डी.) असल्याचे समोर आले. मात्र ही पदवी असताना अॅयलोपॅथी औषधांचा वापर करता येत नाही. तरी देखील संबंधित डॉक्टर हा त्याचा वापर करीत होता. तसेच औषधे लिहून देण्याची चिठ्ठीवर त्यांच्या नावाच्यासमोर बी. ए. एम. एस. व त्याच्या व्हिजिटींग कार्डवर डॉ. एस. के. विश्वास, बी. ए. एम. एस., असे छापून रुग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती मिळाली. यावरून तालुका आरोग्य अधिकारी लोखंडे व पोलिसांनी त्याला रंगेहाथ पकडले.