काळी बाहुली, हळदी-कुंकू, लिंबू, कवड्या, फुलांचा गजर्यासह स्मशान भूमीत काळ्या कापडात बांधलेली गाठोडी स्मशानभूमीतील वडाच्या झाडावर आढळल्याने सोमवारी कामेरी (ता. वाळवा) येथे मोठी खळबळ माजली.
हा अंधश्रध्देचा गंभीर प्रकार समोर आल्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी गाठोडे झाडावरून खाली उतरून पाहणी केली. जादूटोणाचा हा प्रकार विवाहित महिलेसाठी करण्यात आल्याचा संशय असून अंनिसने प्रबोधन करत अशा प्रकारांना न घाबरता धैर्याने सामोरे जाण्याचे आवाहन केले.
कामेरी (ता.वाळवा) येथील स्मशानभूमीत असलेल्या वडाच्या झाडावर काळ्या कपड्यात बांधलेली दोन गाठोडे आढळून आली. यामुळे गावातील नागरिक मोठ्या संख्येने करणीचा प्रकार पाहण्यास जमले.अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना ही बातमी समजतात कार्यकर्त्यांनी कामेरीच्या स्मशानभूमीकडे तात्काळ धाव घेतली. अंनिसचे राज्याचे कार्याध्यक्ष संजय बनसोडे,जिल्हा प्रधान सचिव डॉ राम घुले, अजय भालकर, विनोद मोहिते,बाळासाहेब पाटील,दिलीप क्षीरसागर, आरती सावंत, स्नेहल सूर्यवंशी, अमृत काळे आदी कार्यकर्त्यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधत,त्यांचे प्रबोधन केले.
स्मशानभूमीतील झाडाला काळया कपड्यात दोन गाठोडी होती. त्यामध्ये काळया बाहुल्या, करणीचे साहित्य आढळून आले. तर स्मशानभूमीच्या कठड्यावर एका मोठ्या मडययात काळी बाहुली,पन्नास लिंबू,त्यातील काही कापून त्यावर हळद ,कुंकू टाकलेला होता.पपई,उडीद, कणीक, काळे,हिरवे कापड, कापडी स्कार्फ ,फुलांचा गजरा,पितळेचे व लोखंडाचे खिळे,कवड्या, काळे तीळ,वेलीची चुंबळ तसेच प्राण्याच्या काळजाचे तुकडेही होते. सदरचा प्रकार भयावह वाटत होता.विवाहित महिलेवर ही करणी,जादूटोणा करण्याच्या इराद्याने कोणत्यातरी मांत्रिकाने हा प्रकार करायला लावला असावा असा अंदाज आहे.
यावेळी राज्य कार्याध्यक्ष बनसोडे म्हणाले, कामेरी गाव हे क्रांतिकारकाचा आणि सत्यशोधकी विचाराचा वारसा असणारे गाव आहे, अशा गावात हा प्रकार होतो आहे ही निषेधार्ह गोष्ट आहे. असा जादूटोणा किंवा करणीचा प्रकार करून कोणत्याही व्यक्तीचे कसल्याही प्रकारचं नुकसान होत नाही किंबहुना असे प्रकार करून कुणाचे चांगलेही होत नाही. असे अघोरी प्रकार करणार्या मांत्रिक, बुवाबाबाचा आम्ही शोध घेत आहे. गावातील लोकांनी अशा अंधश्रद्धांना, करणींना अजिबात घाबरता कामा नये. गावातील तरुणांनी स्वत।च पुढाकार घेऊन अशा गोष्टी बाजूला केल्या पाहिजेत निर्भयपणे अशा करणी जादूटोणा करणार्या लोकांचा प्रतिबंध केला पाहिजे. अंनिसचे कार्यकर्ते येत्या दोन दिवसात गावात जाहीर सभा घेऊन ग्रामस्थांचं प्रबोधन करून त्यांच्या मनातील भीती दूर करण्याचे काम करणार आहेत असेही श्री. बनसोडे यांनी सांगितले.






