Friday, August 1, 2025
Homeब्रेकिंगमंदिराच्या पुजाऱ्याच्या हत्येचा उलगडा, पोटचा मुलगाच मारेकरी असल्याचं उघड

मंदिराच्या पुजाऱ्याच्या हत्येचा उलगडा, पोटचा मुलगाच मारेकरी असल्याचं उघड

वाशिमच्या दुर्गामाता मंदिराचे पुजारी मारोती पुंड यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा झाला आहे. मारोती पुंड यांच्या पोटच्या मुलानेच त्यांची हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.

पोलिसांनी गणेश मारोती पुंड (वय 30 वर्षे, रा. केकतउमरा) याला अटक केली आहे. चांगली वागणूक देत नसल्याच्या रागातून मुलाने पित्याची हत्या केल्याचं उघड झालं आहे.

वाशीम ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील केकतउमरा गावालगत असलेल्या दुर्गा मातेच्या मंदिरातील पुजारी मारोती पुंड यांची दोन दिवसांपूर्वी (7 मे) हत्या झाली होती. मारोती पुंड झोपले असताना रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तीने मंदिरात प्रवेश करुन पाठीमागून त्यांच्यावर मानेवर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले होते. शिवाय मंदिरातील दोन दानपेट्या घेऊन फरार झाला. या घटनेत मारोती पुंड यांचं मृत्यू झाला होता.

नेहमीप्रमाणे मारोती यांचा मुलगा गणेश वडिलांना उठवण्यासाठी मंदिरात गेला असता ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. गणेशने याबाबत गावातील नागरिकांना माहिती दिली. त्यानंतर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी डॉगस्कॉड आणि फिगर एक्स्पर्ट तज्ज्ञांसह पाहणी केली. मंदिरातील तीन दान पेट्यांपैकी दोन पेट्या गायब असल्यामुळे चोरीच्या उद्देशाने हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता.

या घटनेचा तपास करणं पोलिसांसाठी मोठं आव्हान होतं. मात्र पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर परिस्थितीजन्य पुराव्यांवरुन मृत मारोती पुंड यांचा मुलगा गणेश मारोती पुंड याला ताब्यात घेऊन तपास केला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता गणेश पुंडने हत्येची कबुली दिली.

…म्हणून मुलाने वडिलांची हत्या केली!
मारोती पुंड हा आपल्या मुलाला चांगली वागणूक देत नव्हता. कायम त्याला घालून पाडून बोलत असे. त्यामुळे दोघा बाप-लेकात सतत वाद होत होते. हा राग मनात धरुन मुलगा गणेश पुंडने पित्याचा खून केला. पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे. वाशिम ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. या हत्येमध्ये आणखी काही आरोपी आहेत का किंवा घटनेचे दुसरं कारण काय असू शकतं याचा तपास पोलीस करत आहेत.

12 ते 15 वर्षांपूर्वी मंदिराची स्थापना
मारोती पुंड यांनी मागील 12 ते 15 वर्षांपूर्वी वाशिम केकतउमरा रस्त्यावर आपल्या शेतात दुर्गामातेच्या मंदिराची स्थापना केली होती. मंदिराची देखभाल आणि पूजाअर्चा मारोती करत असत. हे मंदिर रस्त्याला लागूनच असल्यामुळे भाविकांचा मोठा ओढा या मंदिरात होता. त्यामुळे मंदिरातील दान पेटीत चांगल्या प्रकारे दान मिळत होते. यासाठी मंदिरात तीन दानपेट्या लावण्यात आल्या होत्या. मिळालेल्या दानातून अन्नदान केलं जात असे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -